राजकारण

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारी म्हणून माझ्याकडे राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मी स्विकारला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. संजय राठोड यांनी राजीनामा देतानाच आपली भूमिका एक शिवसैनिक म्हणून माझ्याकडे मांडली आहे. त्यानुसार जोवर चौकशी होत नाही तोवर मी पदापासून दूर राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्येच्या निमित्ताने राजकीय चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे विरोधकांकडून राजकीय भांडवल म्हणून केला जाणारा पूजा चव्हाणचा आत्महत्येचा विषय पाहता जोवर या प्रकरणातील चौकशी अहवाल समोर येत नाही, तोवर मी राजीनामा देऊन पदापासून दूर राहतो असे संजय राठोड यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. विरोधकांकडून गेल्या कालावधीत सत्ताधाऱ्यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे. आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असा प्रकार दुर्दैवी असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही माहिती मांडली.

राठोड यांचे पत्र
या निमित्ताने पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांची विकेट पडल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत या सर्वांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी संजय राठोड यांनी दिलेले राजीनामा पत्र वाचून दाखवले.
“मा. उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत खरं बाहेर यावं. पूजा चव्हाणच्या कुटुंबाचीही बदनामी होत आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी मी आधी शिवसैनिक आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होऊपर्यंत मी मंत्रिपदावर राहणं नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.” असे संजय राठोड यांनी पत्रात लिहिले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड प्रकरणावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणावरही जोरदार टीका केली. संजय राठोड यांनी स्वत:हून माझ्याकडे राजीनामा दिला आहे. पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. तपास हा झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे. पण एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तुम्ही म्हणाल तसा तपास होणार नाही. तुम्ही तपासाला दिशा देऊ शकत नाही आणि तपासही भरकटवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी विरोधकांवर चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं. राजीनामा आल्यानंतर तो फ्रेम करून ठेवायचा नसतो. त्यामुळे तो स्वीकारण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

वन खातं माझ्याकडे
राठोड यांच्या खात्याचा भार कुणाकडे देण्यात आला? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर राठोड यांच्या खात्याचा पदभार माझ्याकडेच आहे. त्यांच्या खात्याचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. अधिवेशनात त्यांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न आल्यास मी त्याला उत्तर देईन किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री उत्तरं देतील, असंही त्यांनी सांगितलं.

मग आताच अविश्वास का?
राठोड प्रकरणाचा तपास नीट होऊ द्या. चौकशी होऊ द्या. केवळ आदळआपट करू नका. आज तुम्ही ज्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवत आहात तीच यंत्रणा आताही काम करत आहे, असं सांगतानाच तुमच्याही काळात चांदा ते बांदापर्यंत ज्या घटना घडल्या. मग आता अविश्वास कसा दाखवता? पोलीस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

कुणालाही पाठीशी घालणार नाही
सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले? गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button