Top Newsस्पोर्ट्स

चेन्नई आयपीएलच्या अंतिम फेरीत; ऋतुराज-उथप्पाचा धडाका, धोनीनेही हात धुतले!

दुबई : चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला क्वालिफायर १ चा सामना अत्यंत चुरशीचा झाला. दिल्लीच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व रॉबीन उथप्पा यांनी शतकी भागीदारी करून चेन्नईला विजयाचे स्वप्न दाखवले. पण, उथप्पा माघारी परतल्यानंतर दिल्लीनं लगेच दोन धक्के देत चेन्नईवर दडपण निर्माण केले. शार्दूल ठाकूरला बढती मिळाली, परंतु तो भोपळ्यावर बाद झाला. ऋतुराज यंदाच्या पर्वात ६००+ धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. अखेरच्या षटकापर्यंत सामन्याचा थरार रंगला. महेंद्र सिंग धोनी मॅच फिनिशर ठरला आणि चेन्नईनं नवव्या वेळी आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला.

पृथ्वी शॉ व रिषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं क्वालिफायर १ सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले. पृथ्वीनं सुरुवात दमदार करून दिली, परंतु मधल्या फळीला अपयश आलं. शिमरोन हेटमायर व रिषभ यांनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. रिषभनं डावाच्या अखेरच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण केल.

शिखर धवनला आज अपयश आले असले तरी पृथ्वी सॉलिड खेळला आणि त्यानं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अक्षर पटेलला प्रमोशन मिळालं, परंतु तो अपयशी ठरला. पृथ्वीनं ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्यानंतर हेटमायर व रिषभ यांची दमदार खेळ केला. दिल्लीनं १८व्या षटकात धावफलकावर १५० धावा झळकावल्या. १९व्या षटकात हेटमार ३७ धावांवर (२७ चेंडू) बाद झाला. ब्राव्होनं ही विकेट घेताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५५०बळी पूर्ण केले आणि हा पराक्रम करणाता तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. रिषभ ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या.

फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला जरी लगेच बाद केले तर चेन्नईवर दडपण येईल हे दिल्लीला माहित होते. अ‍ॅनरिच नॉर्ट्जेनं यानं पहिल्याच षटकात ड्यू प्लेसिसचा (१) त्रिफळा उडवला. पण, दडपण सोडा घडलं भलतेच. आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या रॉबीन उथप्पानं सुरुवातच दणक्यात केली. त्यानं ऋतुराजसह ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. आवेश खाननं टाकलेल्या ६व्या षटकात रॉबीननं दोन षटकार व दोन चौकार खेचून २० धावा चोपल्या. चेन्नईनं पॉवर प्लेमध्येच ५९ धावा करून ताकद दाखवली. रॉबीननं ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावून त्याची निवड सार्थ ठरवली.

सुरेश रैनाच्या जागी संधी मिळालेल्या रॉबीननं धडाकेबाज खेळी करताना दिल्लीच्या गोलंदाजांना धारेवर धरले. त्यानं ऋतुराजसह दुसऱ्या विकेटसाठी ११० धावा जोडल्या आणि आयपीएल प्ले ऑफमधील ही दुसऱ्या विकेटसाठी कदाचित सर्वोत्तम भागीदारी ठरली. टॉम कुरननं रॉबीनला बाद केले. श्रेसय अय्यरनं सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. रॉबीननं ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारासह ६३ धावा केल्या. शार्दूल ठाकूरला आज बढती मिळाली, पण तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अंबाती रायुडूही भोपळा न फोडताच धावबाद होऊन माघारी परतला. सलग तीन धक्के बसल्यानं चेन्नई बॅकफूटवर गेले. ऋतुराज एक बाजू सांभाळून खेळत होता.

चेन्नईला अखेरच्या ५ षटकांत ५२ धावांची गरज असताना मोईन अली व ऋतुराज ही जोडी खेळपट्टीवर होती. १६व्या षटकात ८ धावा जोडण्यात चेन्नई यशस्वी ठरले, परंतु ही सरासरी पुरेशी नव्हती. १७व्या षटकातही ९ धावा जोडता आल्या. आता अखेरच्या तीन षटकांत चेन्नईला १२च्या सरासरीनं धावा करायच्या होत्या. १८व्या षटकात चेन्नईनं ११ धावा केल्या, परंतु १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलनं अप्रतिम झेल घेत ऋतुराजला माघारी पाठवले. ऋतुराजनं ५० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ७० धावा केल्या. रवींद्र जडेजा मैदानावर येणं अपेक्षित असताना महेंद्रसिंग धोनी आला अन् दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचला. दीपक चहर शिट्या वाजवताना आणि साक्षी धोनी जल्लोष करताना दिसले. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या.

टॉम कुरननं टाकलेला स्लोव्हर चेंडू मोईन अलीनं (१६) भिरकावला, परंतु सीमारेषेवर कागिसो रबाडानं तो टिपून चेन्नईला धक्का दिला. पुढील दोन चेंडूवर धोनीनं चौकार खेचले. चौथा चेंडू वाईड फेकल्यानं ३ चेंडू ४ धावा असा सामना अटीतटीचा आला. धोनीनं चौकार मारून चेन्नईचा विजय पक्का केला अन् अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईनं ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button