Top Newsराजकारण

घटना दुरुस्ती विधेयकातील ५० टक्क्यांची मर्यादा हटवा; संजय राऊतांची राज्यसभेत मागणी

नवी दिल्ली: १०२ व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार आणि बंदुका घेऊन लढत आलो आहोत. तागडी आणि तराजू कधीच आमच्या हातात आलं नाही, असं सांगतानाच आम्ही सामाजिक न्यायाची आस घेऊन आलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

आज संसदेत घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभाग घेताना संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग केली. तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ही ३० वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ५० टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.

खासगदार संभाजी छत्रपती या सभागृहात बसले आहेत. ते या आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावर जावी ही त्यांचीही भावना, त्यामुळे सरकारने सर्वांच्याच भावानांचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आमच्या हातात राष्ट्राच्या संरक्षणासाठी नेहमी तलवार किंवा बंदूक राहिली आहे. हा आमचा धंदा राहिला आहे. आमच्या हातात कधी तागडी तराजू आलं नाही. चोपडीही आली नाही. आम्ही तर लढत राहिलो. त्यामुळे सामाजिक न्यायाची आस ठेवून आम्ही आलो आहोत. हा सोशल जस्टिसचा विषय आहे. हा पॉलिटिकल इंजिनीयरिंगचा प्रश्न नाही. शाहू महाराजांनी सर्वात पहिलं आरक्षण दिलं. सामाजिक न्यायासाठी ११९ वर्षापूर्वी त्यांनी आरक्षण दिलं. ५० टक्के आरक्षण दिलं. आरक्षण देणारा राजा महाराष्ट्राचा होता. मराठा होता. आज मराठा समाज रस्त्यावरून आंदोलन करत आहे. हे या देशाचं दुर्देव आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षणाचा हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button