कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी २ दिवसांचे संसदीय अधिवेशन बोलवा : राऊत
मुंबई : देशातील कोरोनाची परिस्थिती ही अत्यंत गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे चर्चेसाठी दोन दिवसाचं संसदेचं अधिवेशन बोलवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.
देशात अभूतपूर्व आणि जवळजवळ युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे अत्यंत गोंधळ आणि तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसीकरण देखील नाही. आता लपवाछपवी बस झाली. अनेक राज्यांमध्ये आकडे लपवले जात होते. त्या लपवाछपवीचा देखील स्फोट झाल्याने अनेक राज्यांमध्ये जागोजागी चिता भडकलेल्या दिसत आहेत. रस्त्यांवर रुग्ण दिसत आहेत. हे प्रकरण जर वाढत गेलं तर या देशामध्ये अराजक माजेल असं चित्र स्पष्ट दिसतंय. त्यामुळे देशाची आरोग्य स्थिती काय आहे? आर्थिक स्थिती काय आहे? याची माहिती घेण्यासाठी दिल्लीमध्ये दोन दिवसांचं संसदीय अधिवेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांचं भाजप नेते समर्थन का करत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.