टोक्यो : कोरोनाच्या संकटामुळे २०२० मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक २०२१ स्थगित करण्यात आली होती. आता मात्र जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी देखील झाली असून भारतानेही आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी केली आहे. दरम्यान ऑलम्पिकच्या उद्घाटनावेळी ध्वजवाहकाचा मान दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना देण्यात आला आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलेल्या माहितीत कुस्तीपटू बजरंग पुनिया याला देखील ८ ऑगस्ट रोजी टोक्यो ऑलम्पिकच्या समारोह सोहळ्यावेळी ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरींदर बत्रा यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली.
ऑलम्पिकच्या इतिहासात यंदा पहिल्यादांच भारताचे एक नाही तर दोन ध्वजवाहक असतील. नरिंदर बत्रा यांनी खेळांमध्ये लैंगिक समानता दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. २०१६ च्या रिओ ऑलम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून एकमात्र व्यक्तिगत ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राला मान देण्यात आला होता.
दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला आहे. २०१२ साली मेरीने ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. ३८ वर्षीय मेरीने आतापर्यंत भारताना अनेक पदकं मिळवून दिली असून तिचे वय पाहता ही तिची शेवटची ऑलम्पिक स्पर्धा असू शकते. त्यामुळे ती यंदा पदक मिळवण्यासाठी जीवाचं रान करणार हे नक्की.