स्पोर्ट्स

हरप्रीतच्या फिरकीची कमाल; पंजाबचा बंगळुरुवर ३४ धावांनी विजय

अहमदाबाद : डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार आणि लेगस्पिनर रवी बिष्णोई या युवा फिरकीपटूंच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ३४ धावांनी विजय मिळवला. हरप्रीतने चार षटकांत १९ धावांत ३ गडी बाद केले. त्याने बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (३५), ग्लेन मॅक्सवेल (०) आणि एबी डिव्हिलियर्स (३) यांना बाद केले. त्याला बिष्णोईने १७ धावांत २ गडी मिळवत उत्तम साथ दिली. त्यामुळे १८० धावांचा पाठलाग करताना बंगळुरूला २० षटकांत ८ बाद १४५ धावाच करता आल्या. बंगळुरूने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. कोहली (३५), रजत पाटीदार (३१) आणि हर्षल पटेल (३१) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे बंगळुरूने हा सामना गमावला. हा त्यांचा सात सामन्यांत केवळ दुसरा पराभव ठरला.

पंजाबने बंगळुरुला विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुने लोटांगण घातलं. बंगळुरुला २० षटकात ८ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर रजत पाटीदारने ३१ धावांची खेळी केली. हरप्रीत ब्रार पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला.

हरप्रीतची अष्टपैलू कामगिरी

पंजाब किंग्सच्या हरप्रीत ब्राररने अष्टपैलू कामगिरी केली. हरप्रीतने आपल्या ४ षटकात १९ धावा देऊन विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डी व्हीलियर्स या स्फोटक फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे हरप्रीतने १ मेडन ओव्हर टाकली. तसेच हरप्रीतने शाहबाद अहमदचा झेल घेतला. तसेच बॅटिंग करताना हरप्रीतने डेथ ओव्हरमध्ये १७ चेंडूत ४ फोर आणि २ सिक्ससह २५ धावांची नाबाद खेळी केली.

हरप्रीत सामन्यातील ११ वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हरप्रीतने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. हरप्रीतने विराटला ३५ धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर पुढील चेंडूवर हरप्रीतने ग्लेन मॅक्सवेलचा काटा काढला. हरप्रीतने मॅक्सवेलला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर १३ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ‘मिस्टर ३६०’ एबी डी व्हीलियर्सला आऊट केलं. अशा प्रकारे हरप्रीतने आपल्या फिरकीच्या जोरावर बंगळुरुच्या मीडल ऑर्डरला तंबूत धाडलं. हरप्रीतने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

त्याआधी या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पंजाबने २० षटकांत ५ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार लोकेश राहुलने अप्रतिम फलंदाजी करताना ५७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावांची खेळी केली. त्याला क्रिस गेल (४६) आणि हरप्रीत (२५) यांची साथ लाभल्याने पंजाबला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button