स्पोर्ट्स

न्यूझीलंडचे भारताला चोख प्रत्युत्तर; २ बाद १०१ धावा, कॉन्वेचे अर्धशतक

साउदम्प्टन : जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ तिसऱ्या सत्रात थांबवण्यात आला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बऱ्याच घडामोडी घडल्या. भारताचा संघ यावेळी २१७ धावांमध्ये सर्वबाद झाला. त्याबरोबर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबण्यापूर्वी न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले आहे.

साउदम्प्टन येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने भारताला दमदार प्रत्युत्तर देत २ बाद १०१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने पाच बळी घेत भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी संघाला दमदार सलामी मिळवून दिली. यानंतर फॉर्मात असलेल्या कॉन्वेने अर्धशतक झळकावत संघाला सुस्थितीत नेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपायला काही चेंडू शिल्लक असताना कॉन्वे बाद झाला. अंधूक प्रकाशामुळे ३२ मिनिटांचा खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडचा संघ अजून ११६ धावांची पिछाडीवर आहे.

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. इंशात शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. चहापानापर्यंत न्यूझीलंडने २१ षटके खेळली, यात त्यांनी बिनबाद ३६ धावा केल्या. चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेने आपले ४४व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. ४९ षटकानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा जमवल्या असून ते अजून ११६ धावांची पिछाडीवर आहेत. विल्यमसन १२, तर रॉस टेलर शून्यावर नाबाद राहिला आहे.

तत्पूर्वी, भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. ६१ धावांवर भारताने आपला पहिला गडी रोहितच्या रुपात गमावला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहितला बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅगनरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. या दोघानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळायचा प्रयत्न केला, पण उपाहारानंतर भारताने अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला गमावले. ट्रेंट बोल्टने पुजाराला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. पुजारानंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि अजिंक्यने भारताला शंभरीपार नेले. तिसऱ्या सत्रात काही वेळ अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात. काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान विराट आणि अजिंक्यने भारतासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. काही षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचानी जाहीर केले. विराट कोहली एका चौकारासह ४४ तर अजिंक्य ४ चौकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला होता.

तिसऱ्या दिवशी भारताने ३ बाद १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. खेळ सुरू होताच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला पायचित पकडले. विराट हा जेमीसनचा दुसरा बळी ठरला. विराटने ४४ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर भारताला ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तिखट मारा करणाऱ्या जेमीसनने त्याला लॅथमकरवी झेलबाद केले. पंत ४ धावा काढून माघारी परतला. विराटनंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने त्याला लॅथमकरवी वैयक्तिक ४९ धावांवर बाद केले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारताला दोनशेपार पोहोचवले. चांगल्या लयीत असलेला अश्विन टिम साऊदीचा बळी ठरला. ३ चौकारांसह २२ धावांची खेळी केल्यानंतर टिम साऊदीने अश्विनला माघारी धाडले. उपाहारानंतर जेमीसनने भारताला लागोपाठ दोन धक्के देत आपले पाच बळी पूर्ण केले. प्रथम त्याने इशांत शर्माला (४) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (०) माघारी धाडले. ट्रेंट बोल्टने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (१५) यष्टीपाठी झेलबाद करत भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलंडला वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताचा अर्धा संघ गारद केला. बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी २ बळी घेतला आले.

अश्विनचा निवृत्तीबाबत खुलासा

https://twitter.com/ICC/status/1406454508998119436

आर. अश्विन हा भारताचा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला आहे. फायनलमध्ये अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अश्विनने यावेळी निवृत्तीबाबत सांगितले की, मी गोलंदाजीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. नवीन गोष्टी करायला मला नेहमीच आवडते. त्यामुळे मी गोलंदाजीमध्ये प्रयोग करत असते आणि माझी गोलंदाजी अचूक कशी होईल, हे करण्याचा मी प्रयत्न करत असतो. पण जेव्हा मी माझ्या या प्रयत्नांमध्ये संतुष्ट होईन किंवा माझ्याकडून जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट होत नसेल तेव्हा मी निवृत्तीचा विचार करेन. कारण त्यावेळी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही.

अश्विनने पुढे सांगितले की, मैदानात मला संघर्ष करायला जास्त आवडतो. मी कधीही विजयाचे जास्त सेलिब्रेशन करताना दिसत नाही. मला त्यावेळी नक्कीच आनंद होत असतो. पण ती एक फक्त घटना असते. त्यासाठी तुम्हाला चांगली प्लॅनिंग करावी लागते आणि त्याचबरोबर तुम्हाला अथक मेहनत घ्यावी लागते. या सर्व गोष्टीचे ते एक फळ असते. त्यामुळे ही जी सर्व प्रक्रीया आहे, त्याचा मी जास्त आनंद घेत असतो. माझी गोलंदाजी अचूक आणि भेदक कशी होईल, हे करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. भारताच्या विजयात माझे कसे सर्वाधिक योगदान असू शकते, याचा मी नेहमीच विचार करत असतो. पण जेव्हा माझ्याकडून नवीन काही घडेल असे वाटत नसेल तेव्हा मी खेळ थांबवण्याचा निर्णय घेईन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button