मी वकिलांच्या क्रिकेटशी निगडीत तसा २००७ पासून आहे. विवेकानंद जगदाळे यांच्याशी माझा संपर्क २०११ मध्ये आला. त्यावेळेस असे जाणवले की, वकिलांच्या क्रिकेटसाठी काही धडपड करणारा, क्रिकेटवर प्रेम करणारा माणूस आाहे, सुस्वभावी असा हा माणूस आहे. या स्पर्धांमधून मला वर्षभरातून किमान पाच लाखाचा व्यावसायिक फायदा होतो, तितकी कामे माझ्या इतर जिल्ह्यातील वकील मित्रांकडून मला मिळतात. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक नोकरी निमित्ताने पुण्यात आहेत. त्यामुळे मीच नाही तर स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या अनेक वकिलांना हा फायदा होतोच. जगदाळे यांनी सांगलीमध्ये सर्वप्रथम या स्पर्धा घेतल्या. त्याचे स्वरुप थोडे वेगळे होते. त्यानंतर त्यात काही वर्षे खंड पडला. कोरोनानंतर आम्ही ‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचे लिलाव करून टीम बनवल्या. त्यासाठी आठ संघ मालक आणि आठ टीम तयार केल्या. यातून ३०० वकिलांना खेळण्याची संधी तर मिळालीच शिवाय आर्थिक लाभही झाला. या स्पर्धेसाठी आम्हांला ‘हिरो’ हा ब्रॅण्ड प्रायोजक म्हणून लाभला. इथून पुढच्या स्पर्धामध्ये आम्ही खेळाडूंना गुण न देता जो खेळाडू जितक्या रकमेला विकला जाईल तितकी रक्कम त्याला देण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. बहुतेक सर्व टीममध्ये असणारे वकील खेळाडू हे नवोदित आहेत. स्पर्धेत सहभाग घ्यायचा तर किमान आठ-दहा दिवस कोर्ट प्रॅक्टिस चुकते, साहजिकच आर्थिक नुसकसान होते. हे नुकसान कुठेतरी भरून निघावे आणि वकिलांमधील खेळाची आवड टिकून रहावी याकरीता काही ठोस करण्याचे आम्ही ठरवतो आहोत. पुण्यामध्ये बॅडमिंटन स्पर्धा, महिला वकिलांच्या क्रिकेट स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन वारंवार केले जाते. यंदा ‘एमएपील’च्या उद्घाटनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीने आमची जबाबदारी वाढली आहे. जगदाळे यांच्यासोबत सर्वच फाऊंडर मेंबर कायमस्वरुपी असतील यात शंका नाही.