भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर; मागितला १५ दिवसांचा अवधी
मुंबई: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे दोन्ही सहकारी आज ईडीसमोर हजर राहिले नाहीत. या दोघांनीही ईडीला पत्रं पाठवून हजर राहण्यासाठी १५ दिवसांची वेळ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भावना गवळी यांचे सहकारी सईद खान आणि हकीम शेख यांना ईडीने समन्स बजावलं होतं. या दोघांनाही २ सप्टेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, हे दोघेही ईडीच्या कार्यालयात आले नाहीत. त्यांनी ईडीला पत्रं पाठवून १५ दिवसांचा अवधी देण्याची विनंती केली आहे. आम्हाला चौकशीला सामोरे जाण्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्यावा. त्यानंतर आम्ही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ आणि सहकार्यही करू, असं त्यांनी म्हटलं आहे. चौकशीला उपस्थित न राहण्यामागे वैयक्तिक कारणही त्यांनी दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. हकीम शेख हे गवळी यांचे सीए आहेत.