मुंबई: मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहे. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट असून त्यासाठी महाविकासआघाडी जबाबदार आहे. पण उर्वरित समाजाचं काय? मराठा समाजाबरोबरच इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या ७६ विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचं काय करायचं? इतर सर्व मागासवर्गीय, NT, SC, ST प्रवर्गातील ३६५ युवकांना अजून नियुक्ती नाही. यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. याचा उद्रेक झाल्यास महाविकास आघाडी सरकारचे पाप ठरेल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. या नियुक्त्यांचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पडळकर यांनी पत्रात केली आहे.