अदर पूनावालांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एस्ट्रेजेनिकासोबतच देशात सर्वात मोठ्या वॅक्सिन निर्मात्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अदर पूनावाला यांच्या सुरक्षेसाठीची जबाबदारी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे.
गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार अदर पूनावाला यांच्या सुरक्षेत केंद्रीय राखील सुरक्षा बलच्या माध्यमातून सुरक्षा देण्यात येईल. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये सरकार आणि नियमन विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून पूनावाला यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसारच केंद्राने हा निर्णय घेतला आहे. भारतात दिल्या जाणाऱ्या कोरोनावरील लसींपैकी एक लस म्हणजे कोविशील्डची निर्मिती सीरममार्फत करण्यात येत आहे. पण सीरम इन्स्टिटयूटच्या अदर पूनावाला यांना अनेक गटांकडून धमकी मिळत असल्याचा उल्लेख सीरमकडून लिहिण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे. सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात हेदेखील नमुद करण्यात आले होते की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेजस्वी नेतृत्वामध्ये भारत सरकारच्या खांद्याशी खांदा जोडून कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत.
वाय दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत एकुण ११ जणांच्या सुरक्षा रक्षकांची टीम आता अदर पूनावाला यांच्यासाठी नेमण्यात आली आहे. त्यामध्ये एक ते दोन कमांडोदेखील असतील. देशभरात सर्व ठिकाणी हे सिक्युरीटी कव्हर असेल. देशभरात कोरोना विरोधातील लढाईत लढणाऱ्या महत्वाच्या अशा व्यक्तींपैकी एक असे आहेत. म्हणूनच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच अदर पूनावाला यांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा देण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सीरमचे अदर पूनावाला यांनी ट्विट करत १०० रूपयांनी लसीची किंमत कमी करत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे याआधी राज्य सरकारला जी लस ४०० रूपयांना मिळणार होती, ती लस आता ३०० रूपयांना मिळेल असेही पूनावाला यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ होईल. तसेच राज्य सरकारचे कोट्यवधी रूपये यामुळे वाचतील. परिणामी अधिकाधिक लसीकरण होणे शक्य होईल आणि अनेक जीवदेखील यामुळे वाचू शकतील असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.