उत्तर प्रदेशात भाजपची ताकद वाढली; २ पक्षांचे विलीनीकरण, ५ संघटनांचा पाठिंबा जाहीर
लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद आणखी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाच्या लखनऊ कार्यालयात उत्तर प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय जनक्रांती पक्षाच्या यूपी युनिटसह आणखी एक राष्ट्रीय समतावादी पक्ष भाजपमध्ये विलीन झाले आहेत. याशिवाय अन्य पाच पक्ष आणि संघटनांनी यूपी निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
राष्ट्रीय जनक्रांती पक्षाचे यूपी प्रदेशाध्यक्ष डॉ. एन.पी. सिंह यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांना विलीनीकरणाचे पत्र सुपूर्द केले. तर, राष्ट्रीय समतावादी पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपाल निषाद यांनी विलिनीकरणाचे पत्र देऊन भाजपसोबत काम करण्याचा संकल्प केला.
पूर्वांचलमध्ये राष्ट्रीय समतावादी पक्षाचा विशेष प्रभाव आहे. पूर्वांचलच्या २५ जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव आहे. त्यामुळेच भाजपने त्यांना सोबत घेतले आहे. खरे तर पूर्वांचलचे वर्चस्व असलेले ओमप्रकाश राजभर हे यावेळी सपासोबत आहेत, त्यामुळे भाजपने स्वतःला मजबूत करण्यासाठी निषाद पक्षाशिवाय राष्ट्रीय समतावादी पक्षाला आपल्याकडे खेचले आहे.
दोन पक्षांच्या विलीनीकरणासह मानवतावादी समाज पक्ष, किसान शक्ती जनतंत्र पक्ष, राष्ट्रवादी ब्राह्मण महासंघ आणि हिंदू युवा वाहिनी इंडियाच्या यूपी युनिटसह इतर अनेक संघटना आणि पक्षांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.