मुंबई : मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. मुंबईतील कोरोना निर्बंधांतही अधिक शिथिलता देण्यात आली आहे. मात्र मुंबईतील सर्वसामान्य तसेच लसवंतांना अजूनही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली नाही. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशा मागणीसाठी भाजपकडून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चगेट स्टेशनहून लोकलने प्रवासही केला. भाजपची मागणी राजकारण वाटत असेल तर हाय कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
भाजपने आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन केलं. चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भाजप कार्यकर्ते जमले. यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं? असा सवाल दरेकर यांनी केला. विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दरेकर यांना रेल्वेकडून २६० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे.
आता मा. न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे.
आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु मा. न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का? pic.twitter.com/Yvp84uYVsZ— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 6, 2021
भाजपच्या रेलभरो आंदोलनामध्ये काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर भाजप नेते मंगल प्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकल प्रवास केला आहे. यावेळी दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, लोकल प्रवासाची विनंती करुन कसं तरी आत आलो, आत आल्यावर ट्रेनमध्ये बसल्यानंतर ही लोकल कारशेडमध्ये जात असल्याचे सांगितले. अशी कुठल्या प्रकारची वागणूक आणि नियोजन सरकारच आहे. प्रवास पण शांत करु देत नाही आणि आंदोलनही करुन देत आहेत. तिकीट मागत आहोत मात्र देण्यास काचकूच करत आहेत, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.
सर्वसामान्यांसाठीच्या लोकल प्रवासासाठी पहिल्या टप्प्यात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बोरिवली मुलुंड, दादरमध्ये आंदोलन केल होते. त्यावेळी सांगितले होते की, रेल्वेमध्ये घुसू आता रेल्वेत घुसलो आहोत. यामुळे सरकारने लवकरात लवकर दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी. जर बस आणि खासगी वाहनाने लोकं प्रवास करु शकतात तर रेल्वेने का नाही करु शकत असा प्रश्नही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आमदार राहुल नार्वेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते जमले होते. यावेळी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सर्व सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कोर्टानेही रेल्वे प्रवासाबाबत विचारणा केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारने प्रस्ताव दिला तर लगेच रेल्वे सुरू करू असं म्हटलं आहे. तरीही सरकार लोकल का सुरू करत नाही? असा सवाल दरेकर यांनी केला.
भातखळकरांचा रास्ता रोको
कोविडचे दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीला सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज तीव्र आंदोलन केले. नोकरीवर जाण्यासाठी लोकल अनिवार्य आहे. सरकार जगण्याचा, रोजगाराचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. pic.twitter.com/jT75aIO30M
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 6, 2021
अतुल भातखळकर शेकडो कार्यकर्त्यांसह कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेर जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक जमाव आक्रमक झाला. यावेळी पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे भातखळकर यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी भातखळकरांसह काही जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या परिसरातील तणाव निवळला.