नवी दिल्ली: हिमालच प्रदेशात पोटनिवडणुकीत प्रचंड पराभव झाल्यानंतर भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आगामी विधानसभेसाठी एकत्रं येण्याचं आवाहन करूनही भाजपमधील हा वाद काही संपताना दिसत नाही. राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री बलराम ठाकूर यांच्यावर तर निशाणा साधलाच आहे, पण राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावरही थेट निशाणा साधल्याने भाजपमधील असंतोष पराकोटीला गेल्याचं दिसून येत आहे.
हिमाचल प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. त्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या पराभवाची जबाबदारी न घेता त्याचं खापर महागाईवर फोडलं. केंद्राच्या धोरणामुळेच राज्यात भाजपला पराभव पत्करावा लागल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं होतं. त्यामुळे राज्यातील नेते संतापले आहेत. जयराम ठाकूर आणि नड्डा यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी असं राज्यातील नेत्यांचं म्हणणं आहे. नड्डा हे हिमाचल प्रदेशातीलच असल्याने ते जबाबदारी टाळू शकत नाही, असं भाजपमधील नेत्यांचं म्हणणं आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत जयराम ठाकूर यांना तंबी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, या बैठकीत ठाकूर यांच्या विधानावर चर्चाही झाली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक नेते संतप्त झाले आहे. शिवाय राज्यातील ठाकूर समर्थक नेत्यांनी महागाईमुळेच राज्यात पराभव झाल्याचं सांगून ठाकूर यांचं समर्थन केलं आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत.
भाजप नेते चेतन बरागटा यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली. आता पक्षाच्या पराभवानंतर भाजपमधील एक गट बरागटा यांच्या बंडखोरीचं उघडपणे समर्थन करून लागला आहे. जुब्बल कोटकाई या मतदारसंघातून ते उभे होते. त्या ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवार नीलम होत्या. बरागटांच्या बंडखोरीमुळे त्यांचा पराभव झाला. तर, काँग्रेसच्या उमेदवाराला पोटनिवडणुकीतील सर्वाधिक मते मिळाली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बरागटा यांचं जाणूनबुजून तिकीट कापल्याचा आरोप पक्षातील एक गट करत आहे.