तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचे नाव डांबराने लिहिले जाईल : अतुल भातखळकर
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. यात आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत बोलताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचे नाव डांबराने लिहिले जाईल, अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचे नाव डांबराने लिहिले जाईल. धक्काबुक्की कुणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केली. आपण गोंधळावेळी डायसवरही गेलो नव्हतो. मात्र, शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझे निलंबन करण्यात आले आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. याचबरोबर, ओबीसी आरक्षणासाठी १०६ आमदारांचे निलंबन केले तरीही आम्ही हा लढा सुरुच ठेवू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते सांगतील त्या प्रमाणे लढाई लढण्यात येईल. आमचे संख्याबळ कमी झाले असले तरी ‘अकेला देवेंद्र काफी है’, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.