राजकारण

भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात : लोंढे

मुंबई : भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत म्हणून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुतळे जाळत आहेत. संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री आणि खासदार बाक वाजवत होते. त्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही, असा घणाघात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेतलं भाषण होऊन अनेक दिवस उलटले. मात्र हा वाद अजूनही संपला नाही. मोदींनी संसदेतून काँग्रेसवर हल्ला चढवताना काँग्रेसमुळे कोरोना वाढल्याचा आरोप केला. काँग्रेसवाल्यांनी मजुरांना मुद्दाम तिकीटं काढून दिली अशी तोफ मोदींनी डागली होती. त्यानंतर राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी भाजपविरोधात चांगलच रान पेटललं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर आक्रमक पवित्रा घेत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यानंतरही भाजप आणि काँग्रेसमधील हा वाद अजून संपला नाही. मोदींनी महाराष्ट्राचा आणि उत्तर प्रदेशातील गोरगरीब मजुरांचा अपमान केला असल्याची टीका सतत काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तर भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुरूवातील काही भजाप नेत्यांनी नाना पटोलेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली. त्यानंतर काँग्रेसकडूनही राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला भाजपनेही नाना पटोलेंचे फोटो जाळून उत्तर दिलं. मात्र यावरून काँग्रेसने आता गंभीर आरोप केलाय.

राज्यातल्या भाजप नेत्यांना महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात अशी तोफ आता काँग्रेसने डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते लढत आहे. काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहे, असे लोंढे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरून बरेच वादंग रंगल्याचे दिसून आले. यात सुप्रिया सुळे यांनीही मोदींना काही तिखट प्रश्न विचारत जहरी टीका केली होती. भाजपकडूनही सुप्रिया सुळेंना उत्तर देण्यात आले होते. मोदींनी संसदेत बोलताना फक्त कोरोना आणि महाराष्ट्रच नव्हे अन्य काही मुद्द्यावरूनही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी मोदी थेट राहुल गांधी यांनाही टार्गेट करताना दिसून आले. यावरूनच राज्याचल्या काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button