Top Newsराजकारण

भाजपला धक्का ! मुकुल रॉय यांची अखेर तृणमूल काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ !

कोलकाता: भाजपचे नाराज नेते मुकुल रॉय यांनी अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुलासह त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

मुकुल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांनी आज दुपारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. प्रवेशाआधी रॉय यांनी तृणमूल काँग्रेस कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी मंत्री राजीव बॅनर्जी आणि माजी आमदार सव्यसाची दत्ताही लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

पक्षात पुन्हा प्रवेश केल्याने आनंद वाटत आहे. बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. माझा ममतादीदींना कधीच विरोध नव्हता, असं रॉय म्हणाले. तर, आपला पक्ष खूप शक्तीशाली आहे. रॉय यांनी निवडणुकीत कधीही आपल्या पक्षाविरोधात टीका केली नाही, असं सांगतानाच निवडणूक काळात ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. जे भाजपने केलं. ते आम्ही करणार नाही. भाजप ही सामान्य लोकांची पार्टी नाही. ती एक एजन्सी पार्टी आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

मुकुल रॉय यांनी सर्वात आधी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी २०१७ मध्ये तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल रॉय यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button