मग गुलामांचे राजीनामे ५ वर्षात खिशातून बाहेर का आले नाहीत? भातखळकरांचा संतप्त सवाल
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आम्हाला पाच वर्षे गुलामाची वागणूक मिळाली. या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे. भाजपने गुलामाची वागणूक दिली म्हणताय मग गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत?; असा संतप्त सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा सवाल केला आहे. विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यानंतर भाजपशी विश्वासघात केला. दगा दिला. आता स्वत:च्या या कृतीचे समर्थन करण्यासाठी असले उद्योग सुरू आहेत, असं सांगतानाच भाजपने गुलामासारखी वागणूक दिली म्हणता, मग सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेची लोणी खाणे बरे वाटते का?, असा सवाल भातखळकर यांनी केला. बाळासाहेब ठाकरे गेले. तेव्हा सोनिया गांधींनी त्यांच्या श्रद्धांजलीचं साधं ट्विटही केलं नाही. काँग्रेससोबत सत्तेत राहणं म्हणजे गुलामगिरीपेक्षाही वाईट आहे. हे शिवसेनेने कायम लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.