शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता थेट कोर्टात जाणार; भाजप खासदार वरुण गांधींचा योगी सरकारलाच इशारा
लखनऊ : भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला असून आपल्या मतदारसंघातील पीक खरेदीत कोणत्याही प्रकारची अनियमितता चालणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कृषी कायदा आणि यूपी सरकारवर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे त्यांना पक्षाच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहे की, जर शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर झुकणार नाही, तर थेट कोर्टात जाणार.
हा व्हिडिओ शेअर करताना वरुण गांधी यांनी लिहिले की, जोपर्यंत एमएसपीची हमी मिळत नाही तोपर्यंत बाजार समित्यात शेतकऱ्यांचे शोषण होतच राहील. त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.
याच व्हिडिओमध्ये वरुण गांधी एका मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. मध्यस्थांचा उल्लेख करून ते म्हणाले, “तुम्ही प्रत्येक गोष्टीत खोटं कारण शोधता. ओलं आहे, खराब आहे, काळं पडलं आहे असं सांगून तुम्ही शेतमाल नाकारता. आणि तेच कमी किंमतीत घेऊन तुम्ही इतरांना जास्त किंमतीत विकता. ते म्हणाले, आतापासून माझा एक प्रतिनिधी राहील आणि प्रत्येक मोठ्या खरेदी केंद्रावर लक्ष ठेवेल. तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार केला असेल किंवा शेतकर्यांवर अन्याय केला असेल तर मी सरकारसमोर हातपाय जोडणार नाही, मी थेट कोर्टात जाऊन तुम्हा सर्वांना अटकेत टाकेन.
याआधीही वरुण गांधी यांनी लखीमपूर जिल्ह्यातील बाजारपेठेत शेतकऱ्यांचे पीक जाळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला होता. शनिवारी वरुण गांधी यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, उत्तर प्रदेशातील शेतकरी श्री समोध सिंह गेल्या १५ दिवसांपासून आपल्या धानाचं पिक विकण्यासाठी मंडईत चकरा मारत होते, धान विकले गेले नाही तेव्हा निराश झाले. त्यांनी तिथेच त्या पिकाला आग लावली. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना कुठे उभे केले आहे? कृषी धोरणाचा पुनर्विचार करणे ही काळाची गरज आहे. यापूर्वीही वरुण गांधी तीन कृषी कायद्यांबाबत बोलले होते.