ज्यांचं तोंड फाटकं त्यांना उत्तर द्यायची गरज नाही; खा. विनायक राऊत यांनी नितेश राणेंना फटकारलं

रत्नागिरी : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे आणि अनिल परब (Anil Parab) यांचे संवाद एनआयएकडे आहेत, असा दावा केला. त्यांच्य याच दाव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणे यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांनी ज्यांचं तोंड फाटलेलं आहे, त्यांना उत्तर द्यायची गरज नाही, अशा टोकदार शब्दांत राणेंवर टीका केली आहे.
मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर अनेक गंभीर आरोप होत आहे. 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे अनेक आरोप होत आहेत. याबाबत विनायक राऊत म्हणाले की, अनिल परब हे पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. भूमिका स्पष्ट करताना त्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. एनआयए किंवा सीबीआय काय करणार आहे ?, हे भाजपचे लोकं अगोदरच बोलून मोकळे होतात. या यंत्रणांचा वापर भाजप कसं करतेय, हे देशातल्या लोकांना कळून चुकलंय. अनिल परब हे एनआयएला संपूर्ण सहकार्य करतील,” असं विनायक राऊत म्हणाले. तसेच सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यातील संवाद एनआयएकडे आहेत, या नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल बोलताना, ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही, असेसुद्धा विनायक राऊत म्हणाले.
विनायक राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. “भाजपच्या नेत्यांनी मागणी केली म्हणजे राजीनामा द्यावा, असं काही नाही. यापूर्वीसुद्धा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी किंवा सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भूतकाळात याहीपेक्षा भयानक आरोप केले होते. त्यामुळे त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला होता की नाही हे प्रकाश जावडेकर यांनी पडताळून पाहावं. सचिन वाझे यांचा बोलवता धनी कोण हे तपासातून बाहेर येईलच, असेही राऊत म्हणाले.