‘भाजयुमो’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर महाराष्ट्रातून दोघांना संधी

नवी दिल्ली : भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या पक्ष कार्यकारिणीने राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता अल्पावधीत राज्याच्या राजकारणात छाप पाडणाऱ्या राम सातपुतेंकडे राष्ट्रीय राजकारणात चमकण्याची संधी चालून आली आहे.

भारतीय जनता पक्षाने पक्षाची युवा संघटना असलेल्या भाजयूमोच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीची आज घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील आमदार राम सातपुते आणि मधुकेश्वर देसाई यांच्यासह इतर पाच जणांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली. यामध्ये अनूप कुमार साहा, मनीष सिंह, अर्पिता अपराजिता बडजेना, डॉ. अभिनव प्रकाश आणि नेहा जोशी यांचा समावेश आहे.
भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम सातपुते यांनी सोलापूरमधील माळशिरस मतदारसंघातून विजय मिळवला होता. राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार उत्तमराव जानकर यांना २ हजार ५९० मतांनी पराभूत केले होते. दरम्यान, राम सातपुते यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केली होती.