शरद पवार-अमित शहा यांच्या बैठकीचा तपशील जाहीर करा; काँग्रेसची मागणी
नवी दिल्ली : गृहमंत्री कोणत्याही बड्या नेत्याला भेटतात तेव्हा या बड्या नेत्यांमध्ये काय घडले? काय बोलणे झाले? हे जाणून घेण्याचा देशाला पूर्णपणे हक्क आहे. तो तपशील जाहीर करावा अशी मागणी कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक देखील पार पडली. एकीकडे या गुप्त बैठकीचं वृत्त राष्ट्रवादी कॉंग्रेस नाकारत आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या बैठकीबद्दल कॉंग्रेसने असे म्हटले, गृहमंत्री जर देशातील कोणत्याही मोठ्या नेत्याला भेटत असतील तर त्यांनी या देशाला ते सांगायला हवे. यासह देशातील लोकांना ते जाणून घेण्याचा अधिकार देखील असल्याते त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुप्त बैठकीबद्दल सांगितले की, गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले की, शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप दोघांमध्ये झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. भेटीच्या बातमीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना नवाब मलिक यांनीही भाजपवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजप बैठकीबद्दल अफवा पसरवत आहे. ते म्हणाले की, या दोघांमध्ये कोणतीही बैठक झाली नाही. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल थेट जयपूर येथून मुंबईत आले होते.
अमित शहा यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भेटीच्या प्रश्नावर उत्तर देखील दिले, ते म्हणाले, “सर्व काही सार्वजनिक केले जाऊ शकत नाही.”