संजय पांडे राज्य सरकारविरोधात हायकोर्टात धाव घेणार
मुंबई : परमबीर सिंग यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये बदली केलेले महासंचालक संजय पांडे देखील उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.
सचिन वाझे प्रकरणानंतर अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली. सर्वात वरिष्ठ असूनही पोलीस महासंचालकपदी नियुक्ती न केल्याने संजय पांडे यांनी राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदली विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता
संजय पांडे राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याचे समोर आले आहे.
संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी केल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद रिक्त झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी असलेले हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी नियुक्त करण्यात आले आणि महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती केली. या बदलीनंतर संजय पांडे यांच्या तुलनेने त्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला महासंचालक नेमण्यात आले. यामुळे संजय पांडे नाराज झाले असून आपल्यावर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी आता संजय पांडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.