
मुंबई : ड्रग्ज प्रकरणी मागील २५ दिवसांपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. मात्र, आज जरी जामीन मिळाला असला तरी आजची रात्र देखील आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरु होईल.
आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं आर्यनचे वकील मुकूल रोहतगी यांनी सांगितलं. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी अटी-शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दावे आणि प्रतिदावे, कोर्टात नेमकं काय घडलं?
आज दिवसभरात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. आर्यनच्या वकिलांनी कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला? त्याला एनसीबीच्या वकिलांनी त्याला काय प्रतिवाद केला?
एनसीबीचे वकील अनिल सिंह यांनी आर्यनच्या जामिनाला विरोध केला होता. आर्यन खान गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे. त्याचं ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन होतं. त्याच्या चॅटमधून या सर्व गोष्टी बाहेर आल्या आहेत. तो ड्रग्जची विक्रीही करायचा हेही त्याच्या चॅटमधून बाहेर आल्याचं अनिल सिंह यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. आर्यनला क्रुझवरील ड्रग्ज पार्टीची माहिती होती. क्रुझवर मोठी पार्टी होणार होती. त्याने कमीत कमी गांधी जयंतीच्या दिवशी असं करायला नको होतं, असंही अनिल सिंह यांनी सांगितलं. तर, आर्यनने पार्टी केलीच नाही असं त्याच्या वकिलांचं म्हणणं असल्याचं न्यायामूर्ती सांब्रे यांनी सांगितलं. आर्यन खान पहिल्यांदा ड्रग्ज घते नाही. तर आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्ज घेत असल्याचंही सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.
रोहतगी काय म्हणाले?
यावेळी आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तीवाद केला. आर्यनची अटक संविधानाच्या अनुच्छेद २२चे उल्लंघन आहे. आर्यनला कोणत्या आधारावर अटक केली त्याची माहिती देण्यात आली नाही, असं रोहतगी म्हणाले. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कुठेही क्रुझवरील पार्टीचा उल्लेख नाही. तसेच व्हॉट्सअॅप चॅट हा काही आधार होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला शिक्षा करून त्याला त्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित केलं जाऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
एनसीबीचं हे प्रकरण एनडीपीएसच्या अधिनियमाच्या ६७ मध्ये दिल्या गेलेल्या स्वैच्छिक कबुलीवर अधिक निर्भर करतं. मात्र टोकन सिंह प्रकरणात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने साक्ष म्हणून अस्वीकार केलं आहे, याकडेही रोहतगी यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.
अरबाजचे वकील काय म्हणाले?
दरम्यान, अरबाज मर्चंट यांचे वकील अमित देसाई यांनीही आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. या तिघांवरही कोणताही आरोप नाहीये. त्यामुळे व्यक्तिगत द्वेषापालिकडे त्यात काही नाही. आरोपींच्या गुन्ह्याला एक वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे सीआरपीसीच्या कलम ४२ अ नुसार त्यांना सादर होण्याची नोटीस द्यायला हवी होती, असं देसाई यांनी सांगितलं. अटकेवेळी या तिघांवरही कटाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अरबाज मर्चंटवर केवळ द्वेषातूनच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
किरकोळ गुन्ह्याच्या आधारावर अटक अपवाद आहे. अर्नेश कुमार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारावरूनही युक्तिवाद केला. पंजाब आणि हरयाणा कोर्टाने एनडीपीएस प्रकरणात भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम ६५ बीनुसार देण्यात आलेल्या प्रमाणपत्रा शिवाय सादर करण्यात आलेले व्हॉट्सअॅप चॅट पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही. डिजीटल पुरावा हा सिद्ध करता आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
धमेचाच्या वकिलांचा युक्तिवाद
मुनमुन धमेच्या हिचे वकील अली काशिफ खान यांनीही कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. मुनमुनला क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. जेव्हा एनसीबीचे अधिकारी कथित तपासणीसाठी आले होते तेव्हा सोमिया आणि बलदेवही रुममध्ये होते. व्यक्तिगत तपासणीवेळी मुनमुनकडे काहीच सापडलं नाही. रोलिंग पेपरमधून धूर निघत होता. तो पेपर सोमियाकडून जप्त करण्यात आला. मात्र, बलदेव आणि सोमियाला जाऊ दिलं गेलं, असं खान यांनी सांगितलं. मुनमुनविरोधात जाणूनबुझून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचा ड्रग्जशी काहीच संबंध नाही. एनसीबीने कायद्याचा दुरुपयोग करून हा गुन्हा दाखल केला आहे, असं त्यांनी सांगितलं.




