Top Newsफोकस

मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास १ हजार रुपये दंड

राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी केली आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी राज्य सरकारने या कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आता दंडाची रक्कम ही २०० वरुन थेट १००० रुपयांवर गेली आहे. राज्यात रस्ते अपघाताची संख्या दिवेसंदिवस वाढत चालली असून ही चिंतेची बाब आहे. वाहन चालक कारवाई होत नसल्यामुळे नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे नवा केंद्रीय मोटार वाहन कायदा लागू केला आहे.

राज्यात लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये दंडात्मक कारवाईतील दंड सध्याच्या कारवाईपेक्षा अधिक आहे. यामध्ये जर बाईकस्वार मोबाईलवर बोलताना बाईक चालवत असेल तर त्याला १ हजार रुपयांचा दंड बसणार आहे. चारचाकी वाहन मालकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एवढ्यावरच भागणार नाही तर पुढील ३ वर्षांच्या कालावधीत दोनवेळा किंवा तिसऱ्यांदा गुन्हा झाला तर थेट १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

जे चालक विनालायसन्स वाहन चालवत असतील त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड घेण्यात येणार आहे. वाहन धोकादायक पद्धतीमध्ये चालवत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याकडून १ हजार रुपयांचा दंड दुचाकीसाठी तर चारचाकी मालकाकडून ३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुचाकी आणि चारचाकी सोडून अन्य वाहन चालकांना ४ हजार रुपयांचा दंड बसणार आहे. यामध्येही तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पुन्हा गुन्हा घडला तर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाही, तसेच वेगळ्या आणि अनोख्या प्रकारच्या नंबर प्लेट लावल्या असतील तर त्या वाहन चालकांवर १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

नव्या कायद्यानुसार ज्या वाहनांमुळे नियमांचे उल्लंघन झाले आहे. अशी वाहने विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित वाहन आयातदार, डीलर आणि उत्पादकावर १ लाख रुपयांचा दंड बसणार आहे. तसेच जे वाहनाचे भाग विकतात त्यांनाही महत्त्वपूर्ण सुरक्षा घटक म्हणून सुचित केलं आहे.

दुचाकीस्वारांसाठी महत्त्वाचा नियम

जे दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय आणि आसन क्षमतेहून जास्त लोकांनी प्रवास केला तर संबंधित दुचाकीस्वाराचे लायसन्स तीन महिन्यांसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट सक्तिचे करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा, ध्वनी प्रदुषण, आणि नियमांचे पालन केले नाही तर वाहन चालकाचा परवाना रद्द करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button