दिग्विजय सिंह यांच्या कथित ऑडियोवरून भाजप आक्रमक
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपनं जोरदार निशाणा साधला आहे. दिग्विजय सिंह यांच्या क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियो क्लिपवरूनभाजप आक्रमक झाली आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा बहाल करण्यात येईल असा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. दिग्विजय सिंह हे पाकिस्तानप्रमाणे बोलत आहेत. यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी उत्तर दिलं पाहिजे, असं भाजप नेते संबित पात्रा म्हणाले.
हे तेच दिग्विजय सिंह आहेत ज्यांनी पुलवामा एक अपघात असल्याचं म्हटलं होतं आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आरएसएसचा कट म्हटलं होतं. हे सर्व त्या टुलकिटचा भाग आहे, ज्यामध्ये भारताची बदनामी करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी कट रचला जात आहे. दिग्विजय सिंह यांचं हे वक्तव्य असं दाखवून देतंय की पाकिस्तानसोबत काँग्रेसचे काही संबंध आहे. काश्मीरमध्ये असलेली शांतता आणि त्या ठिकाणच्या लोकांचं उत्तम होत असलेलं जीवन बिघडवण्याचा हा एक प्रयत्न आहे, असं संबित पात्रा म्हणाले.
संसदेत काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. तसंच यावर संसदेत चर्चा केली जाऊ शकत नसल्याचं सांगितलं. चौधरी यांना सोनिया गांधी यांचं समर्थ होतं आणि संपूर्ण जगानं काँग्रेसची भूमिका काय होती हे पाहिलं. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना हटवण्यासही सांगितलं. या सर्वांचं नेतृत्व राहुल गांधीच करत आहेत. जेव्हा राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये हजारो जाणांच्या मृत्यूबद्दल लिहिलं तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीरमध्ये काय घडतंय हे पाहा असं सांगण्यासाठी थेट संयुक्त राष्ट्रांत पोहोचले, असंही त्यांनी नमूद केलं.
काँग्रेस आणि पाकिस्तानमध्ये काही संबंध आहे आणि सर्वजण या टुलकिटचा भाग आहे. दिग्विजय सिंह यांच्यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी भाजपची मागणी असल्याचंही पात्रा म्हणाले.