राजकारण

शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून उचलबांगडी; सत्ताधारी बॅकफूटवर

मुंबई : मनुसख हिरेन प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे (Sachin Waze) यांना गुन्हे शाखेतून (Crime Branch) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुख प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मनसुख प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरोपांची राळ उडवून दिल्यामुळे महाविकासआघाडी बॅकफूटवर गेली आहे. फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेले पुरावे आणि विषयाच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना मंगळवारी सभागृहात नेमकं काय उत्तर द्यायचं हेच कळेनासे झाले होते. या पार्श्वभूमवीर आता महाविकासआघाडी सरकारचे शिल्पकार आणि संकटमोचक शरद पवार मदतीसाठी धावून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजते.

मनसुख हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरु आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. एटीएस याबाबत कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले. मात्र, अनिल देशमुख यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तत्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते दरेकर यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button