अनिल परब यांच्यावर भाजप, मनसेचा निशाणा

मुंबई : ‘वकील साहेब शपथेवर बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा’ असे ट्विट करत मनसे नेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला.
अंबानी स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेनी एनआयएच्या न्यायालयात पत्र देऊन वकील अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रात अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत वाझेचे आरोप फेटाळत आपल्या मुलींची आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली होती. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे. Advocate साहेब शपथेवर खोट बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहीत असेल ही अपेक्षा, अशा आशयाचे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
वकील साहबकी लग गयी… : नितेश राणे
‘शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून मला मानहानीची नोटीस येणार का, वकील साहेबांची तर लागली आहे ” अशा आशयाचं ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला.
“मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?” असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
नितेश राणेंनी कालही ट्विटरवरुन निशाणा साधला होता. “ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले होते.




