Top Newsफोकस

हवामानातील अनपेक्षित बदलामुळे बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात

भारतीय हवाई दलाच्या चौकशी अहवालातील निष्कर्ष

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलानं दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह १४ जणांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्राथमिक अहवालानुसार, खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाला त्यामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये अडकले आणि कोसळले. ढगांमुळे वैमानिक गोंधळला आणि हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले, असं नमूद करण्यात आलं आहे.

बिपीन रावत यांच्या एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचं विश्लेषण करण्यात आलं. यात हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे कारणं नसल्याचं म्हटलं आहे. तपास पथकानं अपघाताचं संभाव्य कारण जाणून घेण्यासाठी सर्व उपलब्ध साक्षीदारांची चौकशी केली. याशिवाय फ्लाइट रेकॉर्डर आणि कॉकपिट वॉयर रेकॉर्डरची तापासणी केली. यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे सर्व विश्लेषण करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसंच कोर्ट ऑफ इन्क्वायरीनं काही शिफारसी केल्या असून त्यांचं पुनरावलोकन केलं जात आहे.

हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ट्राय-सर्व्हीस तपास पथकानं केलेल्या चौकशीनंतर अपघाताचे अधिकृत कारण जाहीर करण्यात आलं आहे. ५ जानेवारी रोजी त्यांनी तपासातील निष्कर्षाची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही दिली आहे. त्यात तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलेले हेलिकॉप्टर पूर्णपणे पायलटच्या नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पण ढगांमुळे ते त्याच्या ताब्यात असतानाही कोसळले. यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशननुसार, अशा अपघातांमध्ये पायलट किंवा क्रू मेंबर्सना धोक्याची कल्पना नसते.

८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह सैन्याचे १२ जवान सुलूर एअरबेस येथून वेलिंगटन एअरबेसच्या दिशेनं रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. हेलिकॉप्टर इच्छित ठिकाणी पोहोचण्याच्या काही मिनिटांआधीच सुलूर एअरबेस कंट्रोल रुमचा हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button