Top Newsराजकारण

फडणवीसांनी माझे पुनर्वसन करण्याची गरज नाही : लक्ष्मीकांत पार्सेकर

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपला रामराम; अपक्ष लढणार

पेडणे : भारतीय जनता पक्षाचा आपण जड अंत:करणाने निरोप घेतो, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जाहीर केले. ३२ वर्षांनंतर अखेर पार्सेकर यांनी भाजपला रामराम म्हटले व पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांनी माझे मन वळविण्याचे प्रयत्न केले. माझे पुनर्वसन करणार वगैरे बोलले. माझे पुनर्वसन करण्याची गरज नाही, असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांनी मला मांद्रे मतदारसंघातून अपक्ष लढण्याची विनंती केली. मी विचार करण्यासाठी दोन वर्षे घेतली. आमचे डिपॉझिट जप्त होत होते तेव्हापासून आम्ही भाजपमध्ये होतो. मी भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीचा यावेळी अध्यक्ष होतो. मी अध्यक्षपदाचा राजीनामा आजच सायंकाळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना पाठवून देत असल्याचे पार्सेकर म्हणाले. दरम्यान, भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचा पार्सेकर यांनी पुनरुच्चार केला. पार्सेकर यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर करताना समर्थकांनी फटाके वाजवून स्वागत केले.

मांद्रे मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक सिटी, पाण्याचा प्रकल्प, रुग्णालय, केरी-तेरेखोल पूल, विमानतळ प्रकल्प व अन्य प्रकल्पांचे काम गतीने पूर्ण व्हायला हवे. मी पुन्हा आमदार बनून या प्रकल्पांना गती देऊ पाहतो. मांद्रे मतदारसंघातील युवकांमध्ये असलेली बेरोजगारीची समस्याही नष्ट करायची आहे. मी आता पुन्हा निवडणूक लढविणार आहे. खूप जड अंत:करणाने मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

ज्या पक्षाच्या तिकिटावर पार्सेकर तीनवेळा आमदार झाले, पक्षाने मंत्री आणि मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षपदही दिले, त्याच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देवून त्यांनी पक्षासह समर्थकांनाही जोरदार धक्का दिला. त्यांच्या समर्थकासह जनतेलाही ते पक्ष कधीच सोडणार नाहीत असे वाटत होते.

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यावर भाजपने अन्याय केला असे समर्थकांचे म्हणणे आहे. पार्सेकर यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा ३३३ मते मिळाली होती. तेव्हा मतदारसंघात रस्त्यावर पक्षचिन्ह कमळ रंगवायलादेखील कोणीच नव्हते, ते स्वत: कमळ निशाणी रंगवायचे. त्यांची खिल्ली विरोधी पक्षाचे कार्यकर्ते उडवायचे. असा अपमान सहन करत पार्सेकर यांनी पक्ष सावरला. वाढवला. आता त्यांना पक्ष सोडावा लागला असे समर्थकांनी सांगितले. पार्सेकर यांनी पक्ष सोडल्याने जाहीर केल्यानंतर समर्थकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकली; गोव्यातील बड्या नेत्याची पक्षाला सोडचिट्ठी

काँग्रेसने बाणावली मतदारसंघाची उमेदवारी विकली, असा आरोप माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी केला आहे. त्यांनी सर्व खापर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर फोडले आहे. पाशेको हे स्वत: या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवर इच्छुक होते.

बाणावली गट काँग्रेस समितीने उमेदवारीसाठी पाच नावे पाठवून दिली होती. त्यात मिकी यांच्या नावाचाही समावेश होता. बाणावलीत काँग्रेसने अँथनी डायस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २४ तासांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, उमेदवारीसाठी इच्छुकांनी आता आपली नापसंती जाहीरपणे उघड करण्यास सुरुवात केली आहे. पाशेको यांनी तर शनिवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्याचा राजीनामाही दिला.

एका खासगी दूरचित्रवाणीशी बोलताना पाशेको यांनी आपल्या मनाची खंत बोलून दाखविली. अर्थात त्यामागे तिकीट डावलल्याचे प्रमुख कारण होते. मिकी यांनी यासाठी दिगंबर कामत यांना दोषी ठरविले. ‘मी तीनदा बाणावलीचा आमदार होतो, तर एकवेळ नुवे मतदार संघातून विजयी झालो होतो. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मी या पक्षाच्या कार्यक्रमात लोकांना आणले होते.

स्वत: कामत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मी त्यांच्या सरकारात मंत्रीपदी असताना नादिया प्रकरणात त्यांनी मला राजीनामा देण्यास भाग पाडले होते’ असे पाशेको म्हणाले. दरम्यान, ‘डायस यांना उमेदवारी देण्यात फिश फॉर्मेलिन माफिया इब्राहीम मुल्ला यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुल्ला व आमदार विजय सरदेसाई हे पार्टनर आहेत,’ असे पाशेको म्हणाले. २०१७ साली बहुमत मिळूनही काँग्रेसची जी स्थिती झाली, तशीच यावेळीही होणार असेही पाशेकाे म्हणाले.

चोवीस तासांपूर्वी पक्षात प्रवेश केल्यानंतर अँथनी डायस यांना लगेच उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या सरचिटणीस जीना पेरेरा यांनीही, काँग्रेसने उमेदवारी विकल्याचा आरोप केला आहे. बाणावली मतदारसंघातील या उमेदवारीनंतर पक्षातील असंतोषाला वाचा फुटली आहे. ‘काँग्रेसची उमेदवारी ३० लाख रुपयांना विकली जाणार अशा वावड्या आधी उठल्या होत्या. मात्र आता ते सत्य असल्याचे दिसत आहे,’ असे सरचिटणीस जीना परेरा म्हणाल्या. डायस यांना उमेदवारी दिल्याबाबत परेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या स्वत: बाणावलीतून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या.

गट काँग्रेस समितीतर्फे पाच नावाची शिफारस केली होती. डायस हे तृणमूलमध्ये होते. पक्षाची उमेदवारी जाहीर होण्याच्या २४ तास आधी त्यांनी काँग्रेसप्रवेश केला. ते प्रवेश करतात काय आणि त्यांना उमेदवारी जाहीरही केली जाते हे गौडबंगालच होय’ असे त्या म्हणाल्या. ‘पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा हा प्रकार आहे असे त्यांनी सांगितले. डायस यांना उमेदवारी जाहीर करताना पक्षाने दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीलाही अंधारात ठेवले, असे त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button