नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीयप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात काहीतरी मोठा घातपात करण्याचा डाव पाकिस्तानात शिजत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताची सुरक्षा यंत्रणा देखील आता सतर्क झाली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार लष्कर-ए-तोयबाच्या लॉन्चिंग कमांडरसह सात ते आठ दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. तसंच अल बदर या दहशतवादी संघटनेचेही पाच दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
गुप्तचर यंत्रणांनी भारतीय सुरक्षा दलाला १९ जानेवारी रोजी दोन महत्त्वाचे इनपूट दिले आहेत. त्यानुसार अल बदरचे पाच संशयित दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरच्या Datote येथील Nilyal परिसरात आढळून आले आहेत. हे दहशतवादी भारतात तारकुंडी किंवा कंगागली परिसरातून भारतीय हद्दीत घुसखोरी करत हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
दुसऱ्या इनपुटनुसार लष्कर-ए-तोयबाचे ७ दहशतवादी भारतात हल्ला करण्याच्या मनसुबा घेऊन घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. यात लष्कर-ए-तोयबाच्या लॉन्चिंग कमांडरचा देखील समावेश आहे. सध्या हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील कालू दा ढेरी येथील कॅम्पमध्ये आढळून आल्याचीही माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. काश्मीरच्या किनारी या भागातून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न होऊ शकतो अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर देशातील सर्व सुरक्षा दलांना सतर्कच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर आहेत.