पीक विम्याबाबत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक : अनिल बोंडे यांचा आरोप
अमरावती: ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं निकष बदलल्यामुळं शेतकऱ्यांना कमी प्रमाणात नुकसानभरपाई मिळाल्याचं देखील बोंडे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसाच्या सरकारनं खरिप २०१९ मध्ये पीक विमा कंपन्यांसोबत केलेल्या करारानुसार ८५ लाख शेतकऱ्यांना ५७९५ कोटी रुपयाचा लाभ मिळाला होता. परंतु २०२० च्या खरिप हंगामाकरिता उद्धव ठाकरे सरकारनं विम्याचे निकष बदलले. उंबरठा उत्पादन कमी केले आणि त्यामुळे महाराष्ट्रात खरिप २०२० मध्ये फक्त ७४३ कोटी रुपये पीक विमा नुकसानभरपाई वाटप आजपर्यंत शेतकऱ्यांना करण्यात आली, असं अनिल बोंडे म्हणाले. विमा कंपन्यांना मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने ४२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, असा खळबळजनक आरोप भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल बोंडे अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.