Top Newsराजकारण

नवाब मलिक – मोहित कंबोज यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांबरोबरच रंगलेला वाद-विवाद !

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणात सुनील पाटील नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करत मोहित कंबोज यांना प्रत्यु्त्तर दिले होते. या संदर्भात नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत मोहित कंबोज यांच्यावर घणाघाती हल्ला केला. मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर दिवसभर नवाब मलिक, एनसीबी, मोहित कंबोज, सुनील पाटील यांच्यात खडाखडी सुरु असतानाच भाजप नेत्यांनीही मलिक यांच्यावर तोंडसुख केले. एकूणच दिवसभर या प्रकरणात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची ही झलक…

नवाब मलिकांकडून पत्रकार परिषदेपूर्वी ऑडियो क्लिप ट्विट

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप ट्विट केली. या क्लिपमध्ये सॅनविल डिसुझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा नबाव मलिक यांनी केला आहे. यामध्ये सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. दरम्यान, हा संवाद हिंदी भाषेत आहे. तो मराठीत असा आहे…

सॅनविल- सर सॅनविल बोलतोय
व्ही व्ही सिंह- कोन सॅनविल
सॅनविल- सर, तुम्ही एक नोटिस दिली आहे ना मला.
सिंह- अच्छा, सॅनविल, सॅनविल.. बांद्र्यात राहतो ना तू.
सॅनविल- हो, सर. मी जरा बाहेर होतो. माझी तब्येत बरी नव्हती. मला माहिती मिळाली.
सिंह- मग आता परत ये.
सॅनविल- मी अजून पोहोचलेलो नाही. तब्येतही खराब आहे. सर मला एक दिवस हवा आहे आणखी.
सिंह- मग कधी येशील
सॅनविल- मी सोमवारी येऊ का?
सिंह- सोमवारी नको मग तू बुधवारी ये. सोमवारी मी नाही.
सॅनविल- ओके सर.
सिंह- आणि ऐक. मोबाईल घेऊन ये. मला आता जास्त नाटकं नको आहेत. माझ्याकडे तुझा IMI नंबर आहे. तोच फोन घेऊन ये. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय.
सॅनविल- ओके, सर मी तसं नाही करणार
सिंह- ओके. मग बुधवारी ये.

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आर्यन खान प्रकरणावर नवे गौप्यस्फोट केले. यावेळी द ललित हॉटेलचाही त्यांनी उल्लेख केला. ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असं मलिक म्हणाले.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबजनक आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत: गेला नाही. त्याला बोलावलं गेलं. प्रतिक गाभा आणि ऋषभ सचदेवने त्याला पार्टीला बोलावलं होतं. हे किडनॅपिंगचं प्रकरण होतं. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कुणी नसून मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो १२ हॉटेल चालवतो असा दावा मलिक यांनी केला.

कंबोजच्या सांगण्यावरून तिघांना सोडलं

९ तारखेला मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी एक व्हिडीओ दाखवला होता. त्यात वानखेडे ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगत असल्याचं दिसत होतं. त्यावर ८ की १० लोकांना ताब्यात घेतलं? एक अधिकारी नेमका आकडा का सांगत नाही? असा सवाल मी केला होता. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन ८ नव्हे तर ११ लोकांना अटक झाल्याचं सांगितलं. अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा,ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ आम्ही दाखवला. या तिघांचे कुटुंबीय त्यांना एनसीबी कार्यालयातून घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. मोहीत कंबोज यांचे साले असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर वानखेडेने १४ लोकांना अटक केल्याचं सांगितलं. पण या १४ लोकांचं नाव सांगितलं नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे, असंही ते म्हणाले.

भाजपमध्ये गेल्यानंतर घोटाळ्याची चौकशी नाही

मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने ११०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचं पद दिलं. या घोटाळ्याप्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झालं, असा दावाही त्यांनी केला.

समीर वानखेडे आणि भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज हे एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. ड्रग्ज सेवन करणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमध्ये समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे साथीदार होते. मुंबईत मोहित कंबोज यांच्या मालकीची १२ हॉटेल्स आहेत. मोहित कंबोज स्वत:च्या हॉटेल्सच्या आसपास असणारी इतर हॉटेल्स बंद पाडण्यासाठी त्यांच्या मालकांना समीर वानखेडे यांच्या माध्यमातून खोट्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकवत असे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. मुंबईत कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरु केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले. जेणेकरून कुणाल जानी बास्किन हॉटेल बंद करतील, असा मोहित कंबोज यांचा प्रयत्न असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

आर्यन खानला अटक झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर ७ ऑक्टोबरला मुंबईतील ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर समीर वानखेडे यांनी मोहित कंबोज यांची भेट घेतली होती. मात्र, या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे याचा व्हीडिओ माझ्याकडे नाही. परंतु, या परिसरातील लोकांनी ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर अशी भेट झाल्याचे सांगितले आहे. समीर वानखेडे यांना या गोष्टीची कुणकुण लागल्यानंतर समीर वानखेडे यांनी घाबरुन मुंबई पोलिसांकडे कोणीतरी माझा पाठलाग करत असल्याची तक्रार केली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला. मात्र, वानखेडे यांचे नशीब चांगलं होतं की पोलीसांचं सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर वानखेडे घाबरून गेले आणि त्यांनी कोणी तरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. ड्रग्जचा धंदा सुरू राहावा हेच वानखेडेंना वाटतं. बॉलिवूडमध्ये कोण ड्रग्ज घेतं याची माहिती घेऊन वानखेडेंनी दहशत निर्माण केली, असं मलिक यांनी सांगितलं.

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार

जोपर्यंत व्हिलन आत जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असं मलिक म्हणाले.

मोहित कंबोज हा आर्यन खान किडनॅपिंगचा मास्टर माइंड आहे. त्यात सॅम डिसूझाचाही सहभाग आहे. आज ना उद्या ते आतमध्येा जाणारच असंही त्यांनी सांगितलं. माझे आरोप खोटे असल्याचं सांगत समीर वानखेडे आता हसत आहेत. पण नंतर ते रडणार आहेत. सत्यमेव जयते होणारच आहे, असा दावाही त्यांनी केला.

एनसीबीच्या कार्यालयात एक चांडाळ चौकडी आहे. हीच चांडाळ चौकडी सर्व खेळ करत आहे. समीर वानखडे, व्हीव्ही सिंग, आशिष रंजन आणि माने नावाचा ड्रायव्हर यांची चांडाळ चौकडी या प्रकरणात कार्यरत होती. असं सांगतानाच गेल्यावेळी माझ्याकडून एक चुकीची माहिती दिली गेली. व्ही. व्ही. सिंग यांनी माझ्या जावयाकडून रेंज रोव्हर मागितली नव्हती. तर आशिष रंजनने रेंज रोव्हर मागितली होती, असं मलिक म्हणाले.

शाहरुखला घाबरवण्याचा प्रयत्न

आर्यन खानला अटक केल्यानंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनसीबीकडून शाहरुख खानला घाबरवण्याचं काम केलं गेलं. नवाब मलिकने बोलायचं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं होतं, असा दावा मलिक यांनी केला. पडद्यामागे काय होत आहे हे मला माहीत नाही. वानखेडे कुणाला फोन करत आहे हे मी नंतर मी उघड करेन. महिलांनाही धमकावलं जात आहे, त्याचीही माहिती मी उघड करेन, असं त्यांनी सांगितलं.

क्रुझ पार्टीसाठी महाविकास आघाडी सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही निमंत्रण

कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत सेलिब्रिटी आणि मंत्र्यांचा मुलांना अडकवण्याचा कट काशिफ खान याने आखला होता. या पार्टीला येण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही गळ घालण्यात आली होती. मात्र, अस्लम शेख या पार्टीला गेले नाहीत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत पुन्हा एकदा काशिफ खान या ड्रग्ज पेडलरचा उल्लेख केला. क्रुझ पार्टीत काशिफ खानही उपस्थित होता. नमास्क्रे फॅशन टीव्हीच्या स्पॉन्सरचा ब्रँड आहे. काशिफ खान हा त्याचा मालक आहे. नमास्क्रेच्या पेपर रोलमध्ये ड्रग्ज घेतलं जातं असं सांगितलं जाते.

या केसमध्ये हे सँपल स्टॉक सीझ केलं तर त्याच्या मालकाला का अटक केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. देशातील अनेक पोलीस ठाण्यात काशिफ खानविरोधात गुन्हे दाखल आहेत. दिल्ली कोर्टाने फरार घोषित केले आहे. तो समीर वानखेडेचा साथीदार आहे. गोव्यात काशिफ खानची खूप संपत्ती आहे. आपण फॅशन टीव्हीचा इंडिया हेड असल्याचे तो सर्वांना सांगतो. तो पार्टीत नाचत होता. एनसीबीने त्याला अटक का केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा गेम होता

मुंबईतील क्रुझवरील पार्टीला पालकमंत्री अस्लम शेख आणि राजकारण्यांची मुलं गेली असती तर उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र करण्याचा गेम होता, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

या पार्टीला अस्लम शेख यांना काशिफ खान का घेऊन जाणार होता? मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता? कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा हा डाव होता, असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा या प्रकरणाची माहिती देतीलच. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हे मोठं प्रकरण आहे. त्यात पडू नये म्हणजे? एक नागरीक म्हणून सत्य बाहेर आणणं ही माझी जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपविरोधात लढाई नाही

वानखेडेची आर्मी ड्रग्ज वसुली करणाऱ्यांकडूनही पैसे उकळत आहे. वानखेडेंनी या शहराला पाताल लोक केलं आहे. मी एनसीबीविरोधात लढत नाही. मी भाजपविरोधातील लढाई नाही. मी चुकीच्या लोकांविरोधात लढत आहे. या शहरात ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली होत आहे. निरपराध मुलांना फसवलं जात आहे. नशेचा कारोबार चालत आहे. लोकांना टार्गेट करून वसुली सुरू आहे. त्याविरोधात माझा लढा आहे, असंही ते म्हणाले.

मी धमकीला घाबरणार नाही, सुनील पाटीलला भेटलो नाही; नवाब मलिकांचा खुलासा

समीर वानखेडे आणि एनसीबीच्या चांडाळ चौकडीला पाठिशी घालू नका. फसवणूक करणाऱ्यांना पाठिशी घालू नका. माझी लढाई भाजपाविरोधात नाही. एनसीबी विरोधात नाही तर चुकीच्या लोकांविरोधात आहे. मी सत्याची लढाई लढतोय. कुणाच्या धमकीला घाबरणार नाही असं मंत्री नवाब मलिक म्हणाले.

पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी सांगितले की, ६ प्रकरणातून समीर वानखेडे यांना वेगळं केले. त्यात आर्यन खान, समीर खानची केस आहे. ज्या प्रकरणाची चार्जशीट फाईल झाली त्यात पुन्हा तपासणी का करणार आहात? बोगस केस आहेत त्यात समरी दाखल करून निष्पापांना सोडून द्यावं. जीव धोक्यात घालून, कुटुंबाची पर्वा न करता ही लढाई लढतोय. पहिल्यांदाच एनसीबीने फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टविरोधात कोर्टात आव्हानं केले आहे. ८ महिने काय तर २० वर्ष जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचं जावई म्हणाला. त्यामुळे निष्पक्ष चौकशी करा. सत्य समोर आणा असं ते म्हणाले.

सुनील पाटीलचे अमित शाहसोबत फोटो

माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. सुनील पाटीलचे अमित शाहसोबत फोटो आहेत. गुजरातच्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत. आम्ही फोटोवर आरोप लावत नाही. सुनील पाटील हादेखील समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. मी ६ तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यानंतर २ तासाने मला सुनील पाटीलचा फोन आला. मला आणखी काही माहिती द्यायची असल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्याला मुंबईत यायला सांगितले, परंतु तो आला नाही. त्याला पोलिसांसमोर येऊन सत्य सांगायला बोललो तेव्हा तो गुजरातमध्ये असल्याचं सांगितले. अद्याप सुनील पाटील समोर आला नाही असंही नवाब मलिकांनी खुलासा केला.

आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांना सवाल

आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आणि त्यामध्ये मोहित कंबोज हे मास्टरमाईंड होते, असा आरोप मलिक यांनी केल्यानंतर मोहित कंबोज यांनीही मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याचे नाव घेतल्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच ड्रग्स पेडलर्सबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांच्या असलेल्या संबधांबाबत खुलासा करण्याचे आव्हानही कंबोज यांनी मलिक यांना दिले आहे. तसेच या प्रकरणात मी मास्टरमाईंड असल्याचे नवाब मलिक म्हणताहेत, मग ते गेल्या एका महिन्यापासून झोपले होते काय? असा प्रश्न मोहित कंबोज यांनी विचारला आहे.

मोहित कंबोज म्हणाले की, सुरुवातीला मी राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांचे आभार मानतो. गेल्या काही दिवसांमध्ये मी क्रूझ पार्टी प्रकरणाबाबत ज्या गोष्टी मांडल्या, तसेच काल जे काही गौप्यस्फोट केले होते. ते नवाब मलिक यांनी मान्य केले आहेत. आज देशाने आणि महाराष्ट्रातील जनतेने सत्य ऐकले आहे.

काही दिवसांपूर्वी मलिक यांनी एका एका दाढीवाल्याचा उल्लेख केला होता. तेव्हा तो दाढीवाला कोण आहे, हे सांगण्याचे आणि त्याचे कुठल्या मंत्र्याशी संबंध आहेत, हे जाहीर करण्याचे आव्हान मलिक यांना दिले होते. अखेर आज नवाब मलिक यांनी अस्लम शेख यांचे नाव घेतले आहे. हा दाढीवाला अस्लम शेख यांना क्रूझवरील पार्टीसाठी येण्याचे वारंवार निमंत्रण देत होता, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

आता मी मलिक यांना विचारतो की, हा दाढीवाला आणि मंत्र्यामध्ये असी कुठली आघाडी होती, ज्यामुळे नवाब मलिक यांनी आरोप केलेला हा ड्रग पेडलर, ड्रग माफिया असलेला कासिफ खान एका मंत्र्याला अस्लम शेख यांना पार्टीसाठी बोलवत होता. यावरून कासिफ खान आणि अस्लम शेख यांच्यात संबंध असल्याचा माझा आरोप सिद्ध होतो. तसेच त्याचे सत्य नवाब मलिक यांनीच समोर आणले आहे, असे कंबोज म्हणाले.

माझा दुसरा आरोप होता की, या पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या मुलांचा सहभाग होता. त्यांचे ड्रग्स पेडलर्ससोबत संबंध होते. कासिफ खानसोबत त्यांचे संबंध होते. एका ड्रग पेडलरसोबत राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांच्या मुलांच्या असलेल्या संबंधांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे आव्हानही मोहित कंबोज यांनी दिले.

तसेच सुनील पाटील यांच्यासोबत नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप मी काल केला होता. त्याबाबतचे पूर्ण सत्य मलिक यांनी आज सांगितले आहे. सुनील पाटीलचा फोन आल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मात्र त्यांनी पूर्ण माहिती दिलेली नाही. हा सुनील पाटील जेव्हा हॉटेलमध्ये शराब, शबाब आणि कबाबची पार्टी करायचा तेव्हा तिथे चौथा नबाब असायचा. तसेच सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत, असा दावाही मोहित कंबोज यांनी केला.

आता नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे ठरू लागल्यावर या प्रकरणात मीच मास्टरमाईंड असल्याचा आरोत ते करत आहेत. मात्र गेल्या एका महिन्यापासून ते झोपले होते काय? या संपूर्ण प्रकरणातून त्यांचा थयथयाट दिसत आहे. कासिफ खानशी काय संबंध आहेत, याचं उत्तर अस्लम शेख यांना द्यावं लागेल, असेही मोहित कंबोज यावेळी म्हणाले.

सुनिल पाटीलने ‘या’ दोन भाजप नेत्यांचं नाव घेतलं

मंत्री नवाब मलिक आणि भाजपचे मोहित भारतीय यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आर्यन खानचं अपहरण करुन वसुली करण्यामागे मास्टर माईंड मोहित भारतीय असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यानंतर, आता मोहित भारतीय यांनी मलिकांच्या आरोपावर उत्तर देत नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे खोटे आरोप करत असल्याचा पलटवार केला. तत्पूर्वी मोहित कंबोज यांनी ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांचं नाव घेतलं होता. आता, सुनिल पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे.

सुनील पाटील घराला टाळं लावून पळण्याची गरज काय होती? सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे २० वर्षापासून संबंध आहेत. अनिल देशमुख आणि चिंकू पठाण यांची बैठक कशासाठी झाली? चिंकू पठाणला हत्यार आणि कॅशसोबत अटक केली. चिंकू पठाण अटकेनंतर २० जणांना अटक केली गेली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस गप्प का? असा सवाल मोहित भारतीय यांनी विचारला आहे. तसेच, सुनिल पाटील यांचं नाव घेत राष्ट्रवादीच ड्रग्जप्रकरणात मास्टरमाईंट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता, सुनिल पाटील यांनी समोर येऊन भाजपा नेत्यांची नावे घेतली आहेत.

सुनिल पाटील यांनी माध्यमास दिलेल्या मुलाखतीत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली यांच्याकडून माझ्या जीवाला धोका होता, त्यामुळे मी गायब होतो. मी काही दिवस गुजरातमध्ये होतो, मला दिल्लीलाही बोलाविण्यात येत होतं. किरीट सोमय्या, राम कदम या नेत्यांशी भेट घडवून तुला सेफ करू, असेही सांगण्यात येत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांनी केला आहे.

माझी एकच चूक आहे, सॅम डिसुझा, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांची ओळख करुन दिली. माझ्याकडे ड्रग्ज केसप्रकरणाची जी लिस्ट आली ती नीरज यादवकडून आली होती, नीरज यादव हे मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांच्या जवळचे आहेत. माझ्या याप्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सुनिल पाटील यांनी सांगितले. तसेच, माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं, माझ्याकडे ही लिस्ट मनिष भानुशालीकडून आली होती. मी आता मुंबई पोलिसांसमोर जाणार आहे, कारण मला त्यांच्याकडून समन्स आले होते, असेही सुनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

मलिकांकडे इतके पुरावे आहेत मग कोर्टात का जात नाहीत?; एनसीबीचा पलटवार

आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आता या प्रकरणात मलिकांनी आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुख खानकडून वसुली करायची होती. आर्यनला त्याच्या मित्रांनी क्रुझवर नेले होते असा दावा केला. त्याचसोबत सॅम डिसुझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची क्लीप मलिकांनी जारी केली. त्यावरुन आता एनसीबीने मलिकांवर पलटवार केला आहे.

नवाब मलिक एनसीबी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. जर मलिकांकडे इतके पुरावे असतील तर ते कोर्टात का जात नाही? असा सवाल एनसीबीनं केला आहे. आर्यन खान अपहरण आणि वसुली प्रकरणात समीर वानखेडेंचा सहभाग होता असा आरोप मलिकांनी केला. क्रुझ पार्टीचं तिकीट आर्यननं खरेदी केले नव्हते. प्रतिक गाभा आणि अमिर फर्निचरवाला यांनी त्याला पार्टीला बोलावलं होतं असं मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

एनसीबी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डिसुझा आणि वीवी सिंह यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी जारी केले. त्यात काहीही चुकीचं नाही. अधिकारी डिसुझा यांना फोनवरुन काहीही डिलीट करू नको. तुझा आयएमईआय नंबर माझ्याकडे आहे असा इशारा देत होते. समीर वानखेडे सॅम डिसुझाच्या संपर्कात नव्हता असं त्यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी सरकारचा ‘वाझे पार्ट २’, राम कदमांचा निशाणा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकारणाचा शिरकाव झाल्याने मंत्री नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे यांच्यातच वाद रंगला होता. आता, याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आली आहे. काही दिवसांपूर्वी मलिक यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या पत्नीचा ट्विट करुन खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे, भाजप नेत्यांनीही मलिक यांच्यावर आरोप केले आहेत. मलिक यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली, असा सवालही विचारला जात आहे. त्यावरुनच, आता भाजपा आमदार राम कदम यांनी २५ कोटी वसुली ही महाविकास आघाडीचा वाझे पार्ट २ आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र सरकारचा वाजे पार्ट २, असे म्हणत आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. ड्रग्स प्रकरणात किरण गोसावीने शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानीकडून २५ कोटी रुपये मागितले, ही गोष्ट किरणचा माणूस प्रभाकर सेल सांगतोय? आता २५ कोटींची वसुली मागणारे किरण गोसावी राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांचा यांचा माणूस असल्याचे समोर येत आहे. आता प्रश्न असा आहे की २५ कोटी वसुलीचे वाटेकरी कोण? हा नवीन वाझे आहे का? असा प्रश्नही राम कदम यांनी विचारला आहे.

आली रे आली गांजा बहाद्दरांची बारी आली; चित्रा वाघ यांची मलिकांवर बोचरी टीका

मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुख खानकडून वसुली करायची होती. आर्यनला त्याच्या मित्रांनी क्रुझवर नेले होते असा दावा केला. त्याचसोबत सॅम डिसुझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची क्लीप मलिकांनी जारी केली. तसेच, मोहीत भारतीय हा वानखेडेंचा माणूस असल्याचा आरोपही केला. त्यानंतर, भाजप नेत्यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आणि राष्ट्रीय सदस्या चित्रा वाघ यांनीही मलिक यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे… ‘खोदा पहाड निकला चुहां…’, अशा शब्दात त्यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. तसेच, ड्रग्ज व्यापार करणारे उंदीर कोणत्याही बिळात लपून बसले, तरी त्यांना शोधून काढण्याचं काम सरकारी यंत्रणा करणारच. यंत्रणेकडे असे अनेक सिंघम आहेत… आली रे आली गांजा बहाद्दरांची बारी आली, अशी बोचरी टीकाही वाघ यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button