राजकारण

…आणि एकनाथ खडसेंनी फडणवीसांना दिले जेवणाचे निमंत्रण !

मुक्ताईनगर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या घरी भेट दिली. तर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओकवर भेट घेतली. या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. याबाबत एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली असता, फडणवीसांचा जळगाव दौरा आणि आपली पवार भेट हा निव्वल योगायोग असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर आपण फडणवीसांना जेवण करुन जा, अशी विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं.

जळगाव जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसेही उपस्थित होत्या. मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर असताना फडणवीस चहापानासाठी खडसेंच्या नितळीतील घरी गेले. त्यावेळी एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फडणवीस आणि खडसेंचं बोलणं करुन दिलं.

एकनाथ खडसे यांनी फोनवर बोलताना ‘मी मुंबईत आहे. आमच्या घरी आपलं स्वागत आहे. पण मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका’, असा आग्रह फडणवीसांना केला. त्यावेळी फडणवीसांनी “नुकसानाची पाहणी करण्यासाठी आपल्या भागात आलोय. माझे पुढचे कार्यक्रम नियोजित आहेत. मात्र, पुढच्यावेळी आलो की नक्की जेवण करेन”, असं सांगितलं. याव्यतिरिक्त आमच्यात काही बोलणं झालं नसल्याचं खडसे म्हणाले. फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगरला माझ्या घरी येणे आणि मी पवारांना भेटण्यासाठी जाणं हा योगायोग होता. पवार साहेबांची भेट ही नियोजित होती, असंही खडसे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button