ब्रिटन, अमेरिकेत कोरोना रुग्णांची पुन्हा चिंताजनक वाढ
इंडोनेशिया, ब्राझीलमध्ये भयावह परिस्थिती
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/07/corona-3.jpg)
लंडन / न्यूयॉर्क : जगात अनेक देशात लसीकरण मोहीम सुरु असली तरी ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने काळजी वाढली आहे. जगात रुग्णांची संख्या १९ कोटींच्या वर पोहचली आहे, तर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ४१ लाखांवर पोहोचली आहे. जगात आतापर्यंत लसीचे ३.७४ अब्ज डोस देण्यात आले आहेत.
अमेरिकेत पुन्हा एकदा डेल्टाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात एका दिवसात ५६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. लसीकरणाला गती मिळत नसल्याने अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. लसीकरणानंतरही रुग्ण वाढत असल्याने काळजी वाढली आहे. सध्या ब्रिटनमध्ये सरासरी ७०० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. देशात ८८ टक्के वयस्कांना पहिला डोस आणि ६९ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. द. कोरियात दिवसाला १६०० हून अधिक रुग्ण आढळत असल्याने भीती निर्माण झाली आहे. इंडोनेशियात गुरुवारी १४४९ लोकांचा मृत्यू झाल्याने सरकारही हादरले आहे. मलेशियात लॉकडाउननंतरही संसर्ग कमी होताना दिसत नाही.
देशात कोरोनाचे नवे ३९,७४२ रुग्ण
भारतात रविवारी कोरोनाचे ३९,७४२ नवे रुग्ण आढळले तर ५३५ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४,२०,५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,०८,२१२ झाली असून, एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येत हे प्रमाण १.३० टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.