Top Newsराजकारण

राजस्थानमध्ये पायलट समर्थक आमदारांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप

काँग्रेस अंतर्गत कलह वाढला, गेहलोत सरकार संकटात?

जयपूर: राजस्थानमधील काँग्रेस सरकार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. काही आमदारांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा काँग्रेस आमदार वेदप्रकाश सोळंकी यांनी केला आहे. सोळंकी सचिन पायलट गटातील आमदार आहेत. कोणत्या आमदारांचे फोन टॅप केले जात आहेत, याची माहिती सोळंकी यांनी दिलेली नाही. मात्र काही आमदारांनी आपल्याला फोन टॅप होत असल्याची माहिती दिल्याचं सोळंकी यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला सांगितलं.

काही आमदारांनी मला त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची माहिती दिली. हे सगळं कोणाच्या आदेशावरून केलं जातंय त्याची मला कल्पना नाही. राज्य सरकार फोन टॅपिंगमध्ये सहभागी आहे की नाही याबद्दल मी काही खात्रीनं सांगू शकत नाही, असं सोळंकी यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं. ‘माझा फोन टॅप करण्यात येत आहे की नाही याची मला कल्पना नाही. मात्र काही आमदारांनी एका ऍपचा वापर केला होता. आपला फोन टॅप होत आहे का हे तपासण्यासाठी त्यांनी ते ऍप वापरलं. त्यातून त्यांना फोन टॅप केलं जात असल्याचं समजलं,’ असं सोळंकी म्हणाले.

काही आमदारांची फोन टॅपिंगची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. एसीबी आमदारांना अडकवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती काही सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचा दावादेखील सोळंकी यांनी केला. पायलट गटाच्या आमदारांचेच फोन टॅप केले जात आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते काँग्रेसचे आमदार आहेत, असं उत्तर त्यांनी दिलं. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील फोन आमदारांचे फोन टॅप होत असल्याचे आरोप झाले होते. त्यानंतरच राजस्थानच्या राजकारणात भूकंप झाला होता. पायलट समर्थकांनी बंड केलं होतं. अखेर पक्ष नेतृ्त्त्वानं हस्तक्षेप केल्यानंतर हे बंड शमलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button