
नवी दिल्ली : भारताची कोरोना लस उत्पादक कंपनी सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी अखेर भारताच्या वाट्याच्या कोरोना लस परदेशात निर्यात केल्याच्या आरोपावर मौन सोडलं आहे. भारतात कोरोनाच्या लसींचा तुटवडा असताना कोरोना लस परदेशात निर्यात केल्याचा गंभीर आरोप केंद्रातील मोदी सरकारवर आणि सीरमवर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अदर पुनावाला यांनी अधिकृतपणे एक निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अदर पुनावाला आपल्या निवेदनात म्हणाले, भारतासह जगभरात लोकांना कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून कोरोना लस निर्यातीवरुन सरकार आणि सीरमसह भारतीय कोरोना लस उत्पादकांविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्याआधी आपण काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे.
सीरमने भारताताली लोकांच्या जीवाची किंमत मोजून कोरोना लसीची निर्यात केलेली नाही. आम्ही भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शक्य ते करण्यास कटिबद्ध आहोत. सरकारसोबत मिळून मानवतेसाठी जे काही करता येईल ते करण्याचे आम्ही अथक प्रयत्न करतो आहे. हे काम आम्ही यापुढेही करत राहू. ही वेळ आपण सर्वांनी एकत्र राहण्याची आणि सोबत काम करत कोरोनाला हरवण्याची आहे, असंही अदर पुनावाला यांनी पत्रात म्हटलं.
अदर पुनावाला यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे : जानेवारी २०२१ मध्ये आपल्याकडे कोरोना लसींचा मोठा साठा उपलब्ध होता. भारतातही कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीपणे सुरु झाली होती. याशिवाय देशात कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. यावेळी आरोग्य तज्ज्ञांसह अनेकांना भारताने कोरोनावर मात केल्याचं वाटलं.
आपला देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन देशांपैकी एक आहे हेही लोक लक्षात घेत नाहीत. अशा मोठ्या लोकसंख्येसाठीचं लसीकरण २-३ महिन्यात पूर्ण होऊ शकत नाही. यात अनेक अडथळे आहेत. जगभरातील लसीकरण पूर्ण व्हायला कमीत कमी २-३ वर्ष लागतील.
अमेरिकेतील फार्मा कंपन्यांना आपत्कालीन कोरोना लस वापराची परवानगी मिळाल्यानंतर २ महिन्यांनी सीरमला परवानगी मिळाली. असं असतानाही सीरमने आतापर्यंत २० कोटी लसींचं उत्पादन केलंय. जर कोरोना लसींचं उत्पादन आणि पुरवठा याचा विचार केला तर सीरमचा जगात पहिल्या ३ मध्ये क्रमांक लागतो. या वर्षांच्या अखेरपर्यंत कोव्हॅक्स देशांनाही कोरोना लस पुरवठा करण्यास सुरुवात होईल, अशीही आशा आहे.
दुसरीकडे जगातील इतर काही देशांमध्ये कोरोनानं थैमान घातलं होतं. त्यांना तातडीने मदतीची गरज होती. त्यामुळे भारत सरकारने या देशांना मदत देत लस निर्यात केली. २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा सुरुवातीला भारताने इतर देशांना औषधं देऊ केली होती त्याच भावनेतून ही मदत देण्यात आली. यानंतरच आज भारताला परतावा म्हणून जगभरातून मदत मिळते आहे.
कोरोनाची साध ही काही कोणत्याही राजकीय किंवा भौगोलिक भागापुरती मर्यादित नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित झाल्याशिवाय आपण सुरक्षित होऊ शकत नाही. कोव्हॅक्ससोबतच्या आपल्या कराराप्रमाणे जगभरात कोरोनावर नियंत्रणासाठी इतर देशांनाही कोरोना लस पुरवठा करणं आवश्यक होतं.




