अजितदादांची मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड; बहुमत असूनही शिवसेनेला ठेंगा
राजगुरूनगर : अत्यंत चुरस आणि तणावपूर्ण वातावरणात झालेल्या खेड पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण संभाजी चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. सभागृहात शिवसेनेचे बहुमत आहे. पक्षाचे माजी सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
खेड पंचायत समिती सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. १०१ दिवस पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर होते. अविश्वास ठराव मंजुरी व त्या दरम्यान झालेल्या अनेक राजकीय घडामोडी, न्यायालयीन दखल यामुळे हा अविश्वास ठराव गाजला. सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात यावरून गेले तीन महिने राजकीय कलगीतुरा रंगला होता.
सभापती भगवान पोखरकर हे कारागृहात असल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये ते निवड सभेला उपस्थित होते. त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्यावरून पोखरकर यांच्या अर्जावर चौधरी यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पोखरकर यांचा अर्ज अवैध ठरविला. नवनिर्वाचित सभापती चौधरी यांना शिवसेनेच्या बंडखोर ५ सदस्य तसेच भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांचा पाठिंबा होता. शिवसेनेच्या या ५ बंडखोर सदस्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोखरकर यांना मतदान करण्यासाठी आदेश दिला होता. मात्र, बिनविरोध निवड झाल्याने या आदेशाचा उपयोग झाला नाही. यापूर्वी अविश्वास ठराव संमत होताना असाच आदेश देण्यात आला होता. मात्र पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या या सदस्यांनी जुमानले नव्हते. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अरुण चौधरी यांनी सभागृहात येऊन अर्ज दाखल केला. त्यांना वैशाली गव्हाणे यांनी सोबत येऊन सुचक म्हणून स्वाक्षरी केली.
काही वेळाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भगवान पोखरकर यांचे पिंजरा गाडीत आगमन झाले. काँग्रेसचे माजी उपसभापती अमोल पवार, सेनेचे ज्योती अरगडे, मचिंद्र गावडे तत्पूर्वी सभागृहात दाखल झाले होते. आरगडे यांनी सुचक म्हणून स्वाक्षरी केली. दोन वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. मात्र, नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्यावरून पोखरकर यांच्या अर्जावर चौधरी यांनी आक्षेप घेतला. जात प्रमाणपत्र पडताळणी नसल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवल्याचे प्रांताधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
अल्पमतात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करून पदाची रणनीती मोहिते पाटील यांना जमली आणि त्यांच्या पुढे शिवसेना पुरती नमली असे मानले जात आहे. खेड पंचायत समितीत शिवसेना व मित्रपक्ष मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बहुमत आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून माजी सभापती भगवान पोखरकर यांनी राजीनामा द्यावा असा आग्रह धरला होता. यावरून सेनेच्या ६ सदस्यांनी बंडखोरी केली. नंतर एक सदस्य स्वगृही परतले. ५ सदस्यांनी आमदार मोहिते पाटील यांच्या आश्रयाला जाणे पसंत केले. हे सदस्य राजकीय सहलीला असताना त्यातील काहींना परत आणण्याचा प्रयत्न करताना त्या हॉटेलवर भगवान पोखरकर यांनी गोंधळ घातला. त्यावरून त्यांच्या सह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पोखरकरसह काही जण अद्याप तुरुंगात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेच्या खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील खेड तालुक्यावर लक्ष केंद्रित केले होते. महाआघाडी सरकारच्या दोन पक्षाच्या नेतृत्व लढाईत आमदार मोहिते यांच्या माध्यमातून अखेर अजित पवारांची सरशी ठरली.