मनोरंजन

अरुंधती कसा सोडवणार मुलांच्या आयुष्यातील गुंता?

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवं वळण

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे अनिरुद्धसोबतच्या नात्याचा गुंता सोडवत असताना आता अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे यश गौरीचं नव्याने खुलणारं नातं, तर अनघा आणि अभिषेकच्या नात्याची नव्याने होणारी सुरुवात तर दुसरीकडे इशाचं अनोळखी मुलामध्ये गुंतणं. आई म्हणून अरुंधतीने आतापर्यंत आपल्या सर्व जबाबदाऱ्या निगुतीने पार पाडल्या आहेत. मुलांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यात अरुंधतीने कोणतीही कसर राहू दिली नाही. मुलांच्या जोडीदाराच्या निवडीमध्ये देखिल अरुंधती त्यांना मोलाची साथ देणार आहे. यश गौरीचं नातं अनिरुद्धला पटलेलं नसलं तरी अरुंधतीने मात्र ठाम भूमिका घेत या दोघांच्या नात्याला होकार दिला आहे. अभिषेक आणि अंकितामध्ये बिनसल्यानंतर सुस्वभावी अनघा अरुंधतीला अभिषेकची परफेक्ट लाईफ पार्टनर वाटली. अभिषेकलाही अनघा आवडू लागली आहे. मात्र इथेही अनिरुद्धची नकार घंटा आहेच. त्यामुळे अभिषेकचं मन जपत अरुंधतीला यातून मार्ग काढायचा आहे. इशाच्या आयुष्यातही सध्या बरेच चढउतार सुरु आहेत. ज्या मुलाच्या प्रेमात इशा पडली आहे त्याची पार्श्वभूमी फारशी बरी नाही. अर्थात इशाला याची जाणीव नसली तरी अरुंधतीने हे अचूक हेरलं आहे. त्यामुळे तिन्ही मुलांच्या आयुष्यातल्या या नव्या वळणाला सामोरं जाण्यासाठी अरुंधतीने कंबर कसली आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकाकडे पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात घडणारा हा प्रसंग. कसोटीच्या या प्रसंगांना प्रत्येक घरातील गृहिणी ताकदीनीशी सामोरी जाते. प्रत्येक घरात अरुंधती पाहायला मिळते. आपलंस वाटणारं कथानक आणि आपलीशी वाटणारी पात्र यामुळेच आई कुठे काय करते मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मालिकेचा यापुढील प्रवास तितकाच उत्कंठावर्धक असणार आहे. त्यामुळे अरुंधती मुलांच्या आयुष्यातील तिढा कसा सोडवणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button