राजकारण

आत्महत्येपूर्वी पीडित तरुणीची संजय राठोडांशी ९० मिनिटे चर्चा !

मुंबई: बंजारा समाजातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्यानं अडचणीत आलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. संबंधित तरुणी आणि राठोड यांनी अनेकदा एकमेकांना फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. तरुणीनं आत्महत्या करण्याच्या चार-पाच दिवसांपूर्वी तरुणी आणि राठोड यांच्यात फोनवरून संभाषण झालं होतं. याबाबतची बातमी आज एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आली आहे .

बंजारा तरुणी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यामध्ये झालेले संवाद तरुणीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. त्यातला एक संवाद ९० मिनिटांचा आहे. बंजारा तरुणीनं ७ फेब्रुवारीला पुण्यातील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर संजय राठोड अडचणीत सापडले. यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे आमदार असलेल्या राठोड यांची विरोधकांनी कोंडी केली. त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

तरुणीच्या मोबाईलमधून काही पुरावे हाती लागले आहेत. तरुणीशी संभाषण झालेली व्यक्ती राठोड असल्याचं समजतं. तिनं सर्व संभाषणं रेकॉर्ड केली आहेत. बंजारा भाषेत ही संभाषणं झाली आहेत. त्याचं भाषांतर करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे. मूळची बीडची रहिवासी असलेली तरुणी पुण्यात शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी पुण्यात वास्तव्यास होती.

तरुणीच्या मोबाईलमध्ये तिचे संवाद रेकॉर्ड झाले आहेत. मोबाईलमधील डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यात आला आहे. याशिवाय यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील एक सीसीटीव्ही फुटेजदेखील लॅबला पाठवण्यात आलं आहे. हे फुटेज ६ फेब्रुवारीचं म्हणजेच तरुणाच्या आत्महत्येच्या २४ तास आधीचं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फुटेजमध्ये संजय राठोडांचा जवळचा सहकारी अरुण राठोड दिसत आहे. अरुण आणि संजय राठोडांचा आणखी एक निकटवर्तीय विलास चव्हाण तरुणीसोबत पुण्यातल्या हेवन अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. याच इमारतीतून उडी मारून तरुणीनं आत्महत्या केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button