राजकारण

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ६४ टक्के मतदान

नांदेड : देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. या पोटनिवडणुकीसाठी ६४ टक्क्यांच्या जवळपास मतदान झालं. काँग्रेस तथा भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. आता मतदारांचा कौल कुणाला याचीच चर्चा आता रंगलीय. मतदार महाविकास आघाडी सोबत आहेत की भाजपच्या बाजूने याची चाचपणी म्हणजेच ही पोटनिवडणूक असे म्हटले जात आहे. २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले होते.

देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप या दोन पक्षांत प्रमुख लढत आहे. मात्र वंचित बुहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे वंचित आघाडीदेखील स्पर्धेत आली आहे. वंचितच्या जोरदार प्रचारामुळे काँग्रेसची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या निवडणुकीच्या प्रचारात मोठी फौजच उतरवली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंढे, मंत्री नवाब मलिक, एच. के. पटेल यासह डझनभर मान्यवरांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला. तर मंत्री अशोक चव्हाण देगलूरमध्ये तळ ठोकून होते. यासह शायर इम्रान प्रतापगढी, अनिरुद्ध बनकर यांनाही काँग्रेसने मैदानात उतरवले होते. काँग्रेसने या निवडणुकीचा संबंध थेट राज्य सरकार पाडण्यापर्यंत असल्याचा उल्लेख मंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता.

भाजपने देखील या निवडणुकीसाठी कुठलीही कमतरता शिल्लक ठेवली नाही. दोन्ही विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष, रामदास आठवले, शेजारच्या कर्नाटकमधील भागवत खुब्बा, प्रभू चव्हाण आणि नव्या पिढीचे निलेश राणे , गोपीचंद पडळकर या बड्या नेत्यांनी भाजपने प्रचारासाठी उतरवले होते. त्यामुळे काँग्रेस-भाजप प्रचाराच्या सभा चांगल्याच गाजल्या. त्यातच नुकतेच आजारातून बरे झालेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी देखील देगलूरच्या निवडणुकीत उडी घेतली. वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाळासाहेब आंबेडकरची देगलूरला प्रचारसभा झाली. या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

देगलूरच्या या निवडणुकीवर बोलताना विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमचे मागचे ५ वर्ष चांगले की महाविकास आघाडीचे दोन वर्षे चांगली याचं मूल्यमापन करणारी ही निवडणूक असल्याचे सांगितले होते. तर मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला राज्यातील सत्ता पाडायची आहे, त्याचं ट्रायल ते देगलूरमधून घेतायत असे विधान केले होते. दोन्ही नेत्यांच्या या विधानावरून या पक्षांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली होती याची कल्पना येते. दरम्यान या सध्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून लवकरच कोणीच सरशी होणार हे स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button