राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत यांच्यासह ४४ रेल्वे गाड्या रद्द

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसर्या लाटेनं देशात हाहाकार माजवलेला असून, संक्रमणाची नवीन प्रकरणे देशभरात वाढत आहेत. त्यामुळे दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा मोठ्या शहरांतून मोठ्या संख्येने स्थलांतर होत आहेत. वर्क फ्रॉम होम आणि मजुरांचे काम थांबलेले असल्यानं लोक आपल्या गावी परतत आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे गाड्या त्यांच्या घरी नेण्यासाठी प्रवासाचे एक उत्तम साधन आहे. परंतु अलिकडच्या काळात बऱ्याच रेल्वे फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व मार्गांवर सातत्याने रेल्वे सेवा देत होती, परंतु रेल्वे प्रशासनानं दोन दिवसांत ४४ रेल्वे सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. या गाड्या पूर्व रेल्वे आणि उत्तर रेल्वेकडून चालवण्यात येत होत्या. पूर्व रेल्वेने ९ मे पासून १६ विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर २४ तासांच्या आत उत्तर रेल्वेनेही २८ रेल्वे सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
उत्तर रेल्वेने रद्द करण्याचा निर्णय घेतलेल्या २८ रेल्वे सेवांमध्ये रेल्वे बोर्डाच्या एलिट गाड्यांचादेखील समावेश आहे. यामध्ये राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्सप्रेस, जन शताब्दी, दुरांतो एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. या गाड्या ९, १०, ११ आणि १२ मे पासून रद्द करण्यात येत असून, पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात येणार आहे.
रेल्वे सेवा रद्द करण्यामागील वाढत्या कोरोना संसर्गाची प्रकरणे आहेत. उत्तर रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्याचबरोबर पूर्व रेल्वेनेही वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे, रेल्वे सेवा रद्द होण्याचे कारण प्रवाशांची घटती संख्या असल्याचे नमूद केले. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे लोक प्रवास करण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा परिस्थितीत अनेक मार्गांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या कमी होत आहे.
तिकिटांचे पैसे परत कसे मिळतील?
मूळ स्थानकापासून गंतव्य स्थानकापर्यंत ट्रेन रद्द केली जाते, तेव्हाच संपूर्ण तिकिटांची रक्कम जमा केली जाते. त्याची माहिती प्रवाशाच्या पीएनआर स्थितीवर दर्शविली आहे. यात ज्या प्रवाशाकडून तिकीट बुक केले गेले, त्याच्या बँक खात्यात परतावा जमा केला जातो. जर प्रवासी स्वतःच तिकीट रद्द करत असेल तर आयआरसीटीसी परताव्यामधून काही रद्द शुल्क वजा करते. प्रत्येक आरक्षण प्रकारासाठी रद्दीकरण शुल्क वेगवेगळे आहे. ट्रेन रद्द झाल्यास तिकिटांचे संपूर्ण पैसे परत केले जातात.




