दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच; गुणांकनाचा आराखडा २ दिवसांत प्रसिद्ध होणार
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी लागणारा संबंधित आराखडा सोमवारी किंवा मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून, सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला होणार आहे.
दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी व्यक्त केली आहे.