Top Newsराजकारण

मुंबई महापालिकेत शेवटच्या सभेत ६ हजार कोटींचे प्रस्ताव ३१ मिनिटांत मंजूर; प्रचंड गदारोळ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील स्थायी समितीच्या अखेरच्या सभेचा सोमवारी प्रचंड गदारोळ व घोषणाबाजीत समारोप झाला. हरकतीचा मुद्दा मांडू न दिल्याने भाजप सदस्यांच्या गोंधळातच सहा हजार कोटींचे प्रस्ताव अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सादर केले आणि कोणत्याही चर्चेविना ते मंजूर करण्यात आले. अवघ्या ३१ मिनिटे चाललेल्या या सभेत ३७०पैकी बहुतांश प्रस्ताव मंजूर झाले.

स्थायी समितीच्या अखेरच्या सभेत सुमारे सहा हजार कोटींचे ३७० प्रस्ताव मांडण्यात आले होते. दुपारी २.४९ वाजता सभा सुरू झाल्यानंतर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा मांडत आयत्यावेळी सादर केलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, जाधव यांनी नकार देत पहिल्यांदा प्रस्ताव मांडू द्या, नंतर बोलण्यास देतो, असे सांगितले. मात्र शिंदे आणि भाजपच्या सदस्यांनी त्याला विरोध केला आणि ते उठून उभे राहिले. ‘दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, शिवसेना मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरू केल्या.

जाधव यांनी त्या गोंधळात प्रस्तावांचे वाचन सुरू ठेवले. त्यामुळे भाजप सदस्यांनी प्रस्ताव फाडून त्या कागदाचे चिटोरे अध्यक्षांच्या दिशेने फेकले. भाजपचे मकरंद नार्वेकर हे या घटनेचे मोबाईलवर चित्रण करत होते. त्याला शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी बाके वाजवत भाजपविरुद्ध घोषणा सुरू केल्या. या गदारोळातच जाधव प्रस्ताव मांडत राहिले. गोंधळामुळे एकाही प्रस्तावावर चर्चा झाली नाही. अखेर ३.२० वाजता जाधव यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत सभा संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांविरुद्ध घोषणा देत बाहेर पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button