राजकारण

बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारचा भाजपात प्रवेश

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला आणि वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजप प्रचंड जोमाने कामाला लागली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांना देखील भाजपने आपल्या बाजूला वळवले आहे. आता तर थेट बंगाली सिनेमामधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकार हिला आपल्या पक्षात सामील करुन घेण्यात भाजपला मोठं यश आलं आहे. भाजपचं कोलकातामध्ये आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पायल सरकार या बंगाली अभिनेत्रीने भाजपचं कमळ हाती घेतलं. या कार्यक्रमाला भाजपचे क्रेंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष उपस्थित होते.

पायल सरकार ही टॉलिवूडमधील प्रमुख अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने नुकतंच ‘मिर्च 3’ आणि ‘हेचही’ या चित्रपटांमध्ये काम केलं. पायलने आपल्या करिअरची सुरुवात आधी मॉडेलिंगपासून सुरु केलं. त्यानंतर तिला बंगाली चित्रपटांची संधी मिळाली. तिने 2006 साली ‘बिबर’ या चित्रपटातून बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पायलला आतापर्यंत अनेक चित्रपट पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रसिद्ध बंगाली मॅगजिन ‘उनिश कुरी’च्या मुखपृष्ठावरदेखील तिचा फोटो छापण्यात आला होता. तिला 2010 मध्ये ‘ले चक्का’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आनंदलोक पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्याचबरोबर 2014 मध्ये ‘जामेर राजा दिलो बोर’ या चित्रपटासाठीदेखील तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून कलाकार पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button