
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर नाकारण्या इतपत शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार त्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर केंद्राने पवार साहेबांना दिली होती, तर ती ऑफर नाकारण्या इतके पवारसाहेब कच्च्या गुरूचे चेले नाहीत. केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.
कोळश्याच्या टंचाईवरूनही त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. काही झालं तरी त्याचं खापर किंवा दोष केंद्राकडे देऊन मोकळे होतात. कोळसा कमी आहे, केंद्राने कोळसा दिला नाही, असं सांगितलं जात आहे. पण पावसामुळे कोळसा कमी मिळेल. कोळश्याचा स्टॉक करून ठेवा हे केंद्राने आधीच सांगितलं होतं हे ते सांगणार नाहीत. केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळश्याचा साठा करण्यात कमी पडलो हेही ते सांगणार नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.
मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याचा नेहमीप्रमाणे चुकीचा अर्थ लावला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजही जनता ते मुख्यमंत्री असल्यासारखीच अपेक्षा करते. जे त्यांना मराठवाड्याच्या दौऱ्यात जाणवलं. गावागावात लोक म्हणत होते, साहेब तुम्ही असायला हवे होते. यावरून त्यांना आजही मला लोकांमध्ये गेल्यावर मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं. कारण लोकांना उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नाहीये. ते बाहेर पडणार नाहीत हे त्यांनी गृहितच धरलंय. प्रत्येक वेळेला जीवाचा आकांत करून फडणवीसच फिल्डवर आहेत. त्यामुळे साहेब तुम्ही मुख्यमंत्री नसले तरी मुख्यमंत्रीच वाटता, असं लोकं म्हणत आहेत. त्या संदर्भानेच फडणवीसांनी ते विधान केलंय, असं पाटील म्हणाले.
आमची कोअर कमिटी, आमची संघटना लोकशाही तत्वावर चालते. दरमहा आम्ही बसतो. काल आमचे प्रभारी आले होते सीटी रवी. त्यामुळे आमची चर्चा अधिक लांबली, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क यात्रा काढणार आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. आता त्यांच्यावर जनसंपर्क यात्रा काढण्याची वेळ आली आहे का? सत्ताधारी पक्षाने जनसंपर्क यात्रा काढावी? बरं हे जनसंपर्क यात्रेत काय सांगणार आहेत? पूरग्रस्तांना मदत दिली नाही हे सांगणार की कोव्हीडच्या काळात काहीच मदत केली नाही हे सांगणार?, असा सवालही त्यांनी केला.
तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या…
महाराष्ट्रातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि पुण्यात अल्पवीयन कबड्डीपट्टूच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जरा खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची. फडणवीसांच्या काळात पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या, अशी टीका त्यांनी केली आहे.
आता नागपूरमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीकडे सरकारचे लक्ष नाही का? राज्यात महिला असुरक्षित आहेत. पूर्वी महिला रात्री कितीही उशिरा घरी यायच्या एवढ्या सुरक्षित होत्या. केवळ देवेंद्र फडणवीसांमुळे झालं असं नाही. पण महाराष्ट्र असा होता. आता तो संपूर्ण रसातळाला गेला आहे. घरातल्या कुणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, असं सांगतानाच या स्थितीवर सुप्रिया सुळे का बोलत नाहीत?, त्या महिला आहेत. त्यांना जसे माझ्या काळात रस्त्याचे खड्डे दिसायचे. त्या सेल्फी काढायच्या. त्यांना हे सर्व बलात्कार आणि कोयत्याने वार करणं दिसत नाहीत का?, निलमताई कुठे आहेत? त्या तर महिलांच्या अन्यायावर खूप बोलायच्या. त्या विद्याताई चव्हाण कुठे आहेत?. अक्षरश सत्तेसाठी किती अॅडजेस्टमेंट करायची महिलांच्या सुरक्षेसाठीही अॅडजेस्टमेंट करायची, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीतील नाराजी काही तरी ताटात आणखी पाडून घेण्यासाठी असते. त्यामुळे त्यावरून काही तरी निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी हाणला.