लसीकरणाचा उत्सव साजरा करण्यास आधी लस तर द्या; जयंत पाटलांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चार दिवस लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पण लस उत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही लसीचा उत्सव करु. पण आधी लस द्या. जर ही लस नसेल तर लस उत्सवाची वेळ बदला, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र ही लसीअभावी बंद करावी लागली आहेत. तर काही ठिकाणी कोरोना लस तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. त्यावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, तिथे जास्त लस दिली पाहिजे. महाराष्ट्राची मागणी 40 ते 50 लाख इतकी होती. मात्र केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लस मिळाल्या. या लसी लवकर संपतील. आजही बीकेसीच्या कोरोना लसीकरण केंद्रात लस नाही. तिथे लोकं लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण लस उपलब्ध नसेल तर कसं होणार, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
लस वाटप नियंत्रण हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे. पंतप्रधान मोदी जे सांगितले ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही ते केलं. त्यावर टीका केली नाही. पण आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे.
लसीचा तुटवडा, राजकारण तापले
राज्यात 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन आता राज्यात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे.