फोन टॅप होत असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

मुंबई : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी फोन टॅपिंगचा आरोप केल्यानंतर आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्य़ामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून त्यांच्या व्हॉट्सअॅप खात्यावरही निगराणी ठेवली जात असल्याचा त्यांनी आरोप केलाय. मध्यारत्री ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला आहे.
राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा फोन टॅप होत असल्याचा दावा केला आहे. मध्यरात्री दीड वाजता त्यांनी या आशयाचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘मला माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीजकडून माझ्या व्हॉट्सअॅपवरही निगराणी राखली जात असल्याचं मला वाटत आहे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री दीड वाजता त्यांचा फोन टॅप होत असल्याचं म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तसा आरोप करताना कोणाचेही नाव न घेतल्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यापूर्वी 24 जानेवारी 2020 रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीसुद्धा फोन टॅपिंगसदर्भात अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी थेट भाजपचे नाव घेऊन एका भाजपच्याच एका माजी मंत्र्याने त्यांचा फोन टॅप होत असल्याचं सांगितल्याचं दावा केला होता. राऊतांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.