
मुंबई : दहीहंडी सण साजरा करू देण्यासाठी गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आपण सण, उत्सव काहीकाळ बाजूला ठेवू असं आवाहन करत दहीहंडीवर यंदाही निर्बंध असतील याबाबतचे संकेत दिले आहेत.
दहीहंडी सण थाटात साजरा करण्यासाठी शासनानं परवानगी द्यावी नाहीतर आंदोलन करु असा इशारा दहीहंडी मंडळांच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. त्यात भाजपानंही दहीहंडी सण कोरोना संबंधीचे नियम पाळून साजरा करू देण्यास परवानगी देण्यास हरकत नाही अशी भूमिका घेतली आहे. सण साजरा करण्यासाठीच्या काही मागण्या घेऊन गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री ठाकरेंसोबत बैठक केली. यात मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेचा जीव वाचवणं हेच आपलं प्राधान्य असलं पाहिजे, असं ठाम मत व्यक्त केलं आहे.
जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवू, मानवता दाखवू आणि कोरोनाला हद्दपार करु, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यायला हवा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आपले सण आपण जपलेच पाहिजेत. पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करत आपण आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची अवस्था आपण पाहायला हवी. लसीकरण झालेलं असतानाही काही देशांमध्ये लॉकडाऊन लावावं लागलं आहे. तर इस्रायलनं पुन्हा मास्क वापरायला सुरुवात केली आहे. आपण जर आता समजुतीनं घेतलं नाही आणि त्यानुसार वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मनसे दहीहंडीवर ठाम
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. गणेशोत्सवाला परवानगी आणि दहीहंडीसाठी कोविडचा बाऊ हा कुठला न्याय? किमान त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार सरकारने करायला हवा. तेव्हा, कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील असा थेट इशाराच मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारला दिला आहे.
राजकीय दौरे, मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणाऱ्या सरकारकडून केवळ मराठी सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडून विरोध करीत आहे. एकतर दहीहंडीसंबधात आज मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते. जे उपस्थित होते त्यांना तर बोलूही दिले नाही. केवळ टास्क फोर्सने आपले कोविड पालुपद सुरू ठेवल्याचा आक्षेप या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी नोंदवला आहे. याचाच अर्थ सरकारला तरुणाईच्या इच्छा आकांक्षाशी काही देणे घेणे नाही. गेली दोन वर्षे ही तरुण मंडळी दहीहंडीचा सण साजरे करू शकलेले नाहीत असे मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.
हिंदूविरोधी सरकारने रोखले तरी दहिहंडी होणार : आ. राम कदम
दरम्यान, राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी थेट आव्हान दिलंय. महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखलं तरी यंदाची दहिहंडी होणार, असं राम कदम यांनी म्हटलंय. जनतेला अपेक्षा होती की हिंदुंचा हा मोठा सण आहे आणि तो होईलय. फक्त काही नियम आखून दिले जातील असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करत आहोत. अपशकुनी वसुली सरकार बिअर बार उघडण्यासाठी नियम लावतं. तर नियम लावून मंदिरं उघडायला काय हरकत आहे. हिंदू उत्सव साजरा करायला निघालो आहोत तर सरकार त्यावर बंदी घलत आहे आजची बैठक ही केवळ फसवणूक करणारी होती. या बैठकीला फक्त सरकारचं समर्थन करणारे आजी-माजी आमदार होते. अनेक मंडळांना त्यांनी विचारात घेतलं नाही. चर्चा करायची नाही आणि निर्णय घ्यायचा, मग बैठक घेता तरी कशाला? असा सवाल राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.
फसव्या घोषणा करणारं आणि लोकांना फसवणारं हे सरकार आहे. बार उघडताला तिसरी लाट आडवी येत नाही. मात्र, मंदिरं उघडण्यासाठी तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जाते. दारुची दुकानं कोरोनाप्रुफ आहेत का? कोणत्याही परिस्थितीत घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सव होणारच. ५०० गुन्हे दाखल करा. तुमच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, अशी आक्रमक भूमिका राम कदम यांनी घेतली आहे.




