राजकारण

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी : गणेश नाईक

शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी मुंबई : नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले. तसेच नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली.

आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारी आमदार आशिष शेलार आणि गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

क्रिस्टल हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, सागर नाईक, संदीप नाईक यांच्यासह संजय उपाध्याय असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जनतेच्या सेवेसाठी आपण काम करीत आहोत. जनतेने आपल्या प्रेम दिले असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकूण आर्थिकदृष्ट्या विचार करून सामान्य नागरिकांना कशी लस उपलब्ध करून देणार याबाबत निर्णय घेतीलच. पण जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे १५ लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये १५० कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आपण नुकतीच पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांना मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील एक नंबरचे स्वच्छ शहर झाले. या स्वच्छ शहराला आता भाजपला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जनता भाजपलाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button